

पुणे: वीजचोरीविरोधी तडाखा देण्याच्या मोहिमेमध्ये महावितरणने आता एआयच्या ‘सुपर इंटेलिजन्स’चा वापर करून वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राइक सुरू केला आहे. तब्बल 190 भरारी पथकांकडून वीजजोडण्यांची तपासणी आणि एआय मोड्यूलच्या सूक्ष्म विश्लेषणातून गेल्या तीन महिन्यांत राज्यात 66 कोटी 28 लाख रुपयांच्या 27 हजार 964 वीजचोर्यांचा पर्दाफाश झाला आहे.
आत्तापर्यंत वीजचोरी व तडजोड शुल्काची रक्कम न भरलेल्या 289 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वीजचोरीविरोधी पारंपरिक तपासणीसोबतच महावितरणने आता हायटेक मोहीम उघडली आहे. यासाठी थेट ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ व ‘मशिन लर्निंग’चा वापर करून वीजचोरीचे अचूक भाकीत करणारे मोड्यूल तयार केले आहे.
वीजग्राहकांचा किंवा परिसरातील वीजवापराचा जुना आलेख, अचानक घटलेली किंवा वाढलेली मागणी, मीटरमधील तांत्रिक फेरफार आणि इतर 50 हून अधिक तांत्रिक निकषांचे हे मोड्यूल 24 तास सूक्ष्म विश्लेषण करीत आहे.
ज्या ग्राहकांच्या वीजवापरामध्ये शंकास्पद फरक आढळत आहे, त्या ग्राहकांना हे एआयचे मोड्यूल ‘हाय-रिस्क’ श्रेणीत टाकत आहे. त्यामुळे कोणत्याही तपासणीशिवाय थेट चोरी होणार्या ठिकाणाची अचूक माहिती या मोड्यूलद्वारे उपलब्ध होत आहे.
एआयच्या ‘सुपर इंटेलिजन्स’चा वापर करून वीजचोरीच्या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी महावितरणची राज्यभरात 190 हून अधिक विशेष भरारी पथके कार्यरत आहेत.
वीजचोरीविरोधी धडक कारवाईत कुठेही हयगय होऊ नये, यासाठी वीजजोडण्यांच्या तपासणीपासून ते वीजबिलांच्या आकारणीपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ‘थेफ्ट ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टिम’द्वारे पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे.
यासाठी एक स्वतंत्र मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. वीजचोरीचे ठिकाण ते तपासणीचे लाइव्ह फोटो, डिजिटल पंचनामा, जागेवरच वीजपुरवठा खंडित करणे आणि दंडात्मक बिलांची वसुली करेपर्यंतची सर्व माहिती या अॅपमध्ये रिअल-टाइम अपडेट केली जात आहे. त्यामुळे कारवाईत अत्यंत पारदर्शकता आणि वेग आला आहे.
गेल्या जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत महावितरण अंतर्गत विशेष पथकांनी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक विभागात 5 हजार 83, कोकण 11 हजार 83, नागपूर 5 हजार 949 आणि पुणे प्रादेशिक विभागात 5 हजार 849, अशा एकूण 27 हजार 964 वीजचोर्या उघड केल्या आहेत.