

पुणे: राज्यातील खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांचा कालावधी जवळपास संपुष्टात आला असून, सरासरी क्षेत्राच्या ८२ टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या आता पूर्ण झालेल्या आहेत. पावसाचा जोर कायम असून, पाणी उपलब्धतेमुळे विशेषतः भातपिकाच्या लावण्यांनी बहुतांश ठिकाणी वेग घेतलेला आहे.
त्यामुळे सरासरी क्षेत्रांइतक्यावर भात लावण्या पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. राज्यात खरीप हंगामातील मुख्ये पिके असलेल्या सोयाबीनची ९६ टक्के, कापसाची ८६ टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झालेली असून, मकाक्षेत्रात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १२२ टक्क्यांइतकी पेरणी पूर्ण झालेली आहे.
कृषी आयुक्तालयाच्या सोमवारअखेरच्या (दि. २७) ताज्या अहवालानुसार पेरण्यांखालील क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे. राज्यातील खरीप पिकांखालील एकूण सरासरी क्षेत्र हे १४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टरइतके आहे, तर प्रत्यक्षात ११७ लाख ६८ हजार ८७१ हेक्टर म्हणजे सरासरीच्या ८२ टक्के क्षेत्रावरील पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
सोयाबीनच्या सरासरी ४७.२१ लाख हेक्टरपैकी ४५.१० लाख हेक्टरवर, कापसाच्या सरासरी ४२.४७ लाख हेक्टरपैकी ३६.४९ लाख हेक्टर, मक्याच्या ९.३३ लाख हेक्टरहून अधिक म्हणजे ११.४३ लाख हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. भात पिकाखालील सरासरी क्षेत्र १५ लाख हेक्टर असून, सद्यस्थितीत ५ लाख ८५ हजार ४१२ हेक्टरवरील भाताच्या लावण्या पूर्ण झालेल्या आहेत.
जून महिन्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्याचे चित्र होते. मात्र, जुलै महिन्यातील मुबलक पावसामुळे पेरण्यांचा टक्का सद्यःस्थितीत ८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामध्ये भात पिकाच्या लावण्या वाढल्यानंतर पेरणी क्षेत्रात आणखी वाढ अपेक्षित आहे. मूग आणि उडीदाच्या पेरण्यांचा कालावधी पावसाअभावी वाया गेला. त्या शिल्लक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी सोयाबीन आणि मका पेरणीस प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याच्या पेरणीस शेतकरी प्राधान्य देतात. तसेच पशुखाद्य बनविण्यासाठी मक्याला कंपन्यांकडूनही मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून मका पिकाखालील पेरणी क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.
वैभव शिंदे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.