

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, येत्या 4 मेनंतर कधीही निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य मंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे10 फेबुवारी ते 18 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 10 हजार 664 शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील 15 लाख 32 हजार 487 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीची विद्यार्थिसंख्या सुमारे 27 हजारांनी वाढली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य मंडळाकडून बारावीचा निकाल तयार करण्याचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आहे. येत्या 30 एप्रिलला निकाल लावण्याची तयारी राज्य मंडळाने केली होती. परंतु, काही तांत्रिक कारणास्तव हा निकाल पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आणि पुढे शनिवार, रविवार आल्यामुळे 4 मे नंतर निकाल जाहीर करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे एकतर 30 एप्रिल किंवा 4 मेनंतर राज्य मंडळाच्या बारावीचा निकाल कधीही जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य मंडळांचे कर्मचारी संपाच्या तयारीत...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ही संस्था स्वायत्त असल्यामुळे संबंधित संस्थेने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बदली तसेच पदोन्नतीसंदर्भात एक नियमावली तयार केली होती. त्यानुसारच संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या बदली आणि पदोन्नती होत होत्या. परंतु, राज्य शासनाने आता शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदलीसाठी एक नवीन नियमावली जाहीर केली आहे.
या नियमावलीच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे दोन गट राज्य मंडळात तयार झाले असून, त्यातील नियमावलीच्या विरोधात असलेल्या गटाने लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी जर आंदोलन सुरू केले तर त्याचा थेट फटका दहावी-बारावीच्या निकालाला बसणार असल्याची माहिती देखील संबंधित सूत्रांनी दिली आहे.
गेल्या वर्षी 5 मे रोजी जाहीर करण्यात आला होता निकाल
राज्य मंडळाने गेल्या वर्षी 5 मे 2025 ला बारावीचा निकाल जाहीर केला होता. त्यामुळे यंदा देखील 5 मे 2026 ला निकाल जाहीर होणार की निकालाची तारीख पुढे जाणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.