

पुणे: केंद्र सरकारने मे महिन्यासाठी जाहीर केलेला साखरेचा 22 लाख 50 हजार टनांचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा आहे. त्यामुळे सोमवारी कोटा घोषित होताच साखर निविदांमध्ये किंचित वाढ होऊन घाऊक बाजारातही दर क्विंटलला 50 रुपयांनी वधारले.
वाढत्या उकाड्यामुळे आणि लग्नसराईमुळे साखरेस मागणी चांगली राहण्याची अपेक्षा आहे. घाऊक बाजारात एस 30 ग््रेाड साखरेचा क्विंटलचा दर आता 4050 ते 4100 रुपयांवर पोहचला असून, मागणी वाढताच या दरात आणखी वाढ होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच शीतपेये, थंडपेये आणि आईस्क्रिम उत्पादकांची मागणी साखरेस वाढते. यात्रा-जत्रा, लग्नासराईमुळेही नेहमीच्या तुलनेत खप वाढत असतो. त्यामुळे साखरेचा किमान 25 लाख टनाइतका कोटा जाहीर होणे अपेक्षित असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मात्र, मागणीच्या तुलनेत अपुरा कोटा जाहीर करण्यात आल्यामुळे साखरेचे दर तेजीकडे झुकल्याचे दिसून आले आहे. कारण कोटा जाहीर होताच साखरेच्या निविदांमध्ये क्विंटलला 30 रुपयांनी वाढ होऊन दर 3730 ते 3750 रुपयांवर पोहोचल्या. तर घाऊक बाजारातही क्विंटलला पन्नास रुपयांनी वाढ होऊन दर 4050 ते 4100 रुपये झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
मे महिन्यासाठी कमी कोटा मंजूर झाल्याने पुरवठा कमी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात मे महिन्यातील कोट्यानुसार साखर विक्रीच्या निविदा सुरू झाल्यानंतर याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होईल. परंतु, मागणी वाढती राहणार असल्याने साखरेच्या तेजीला पोषक स्थिती निर्माण झाल्याचेही घाऊक बाजारातून स्पष्ट करण्यात आले.