Pune Politics: महायुतीमधील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या शहरातील सहाही मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दरम्यान, कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी समाज माध्यमाद्वारे जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील आठपैकी कोथरूड, शिवाजीनगर, पर्वती, कसबा पेठ, पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासला हे सहा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आले आहेत. वडगाव शेरी व हडपसर हे दोन मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला गेले आहेत. खरे तर शहरातील सर्वच आठही मतदारसंघांत भाजपचे मोठ्या संख्येने इच्छुक होते. मात्र, भाजपने इच्छुकांमधून पुन्हा विद्यमान आमदारांवरच आपला विश्वास दाखवत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
भाजपने सर्वप्रथम कोथरूड, शिवाजीनगर आणि पर्वती मतदारसंघातून विद्यमान आमदारांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर भाजपने शनिवारी पुणे कॅन्टोन्मेंटसाठी विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना, खडकवासल्यासाठी विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना, तर कसबा पेठसाठी माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे.
कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उर्वरित उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी 28 आणि 29 ऑक्टोबर असे शेवटचे दोन दिवस मिळणार आहेत. दरम्यान, उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्याने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
शहराध्यक्षांची नाराजी
कसबा पेठमधून हेमंत रासने, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र कुणाल टिळक इच्छुक होते. त्यातच कसब्यातून ब्राम्हण उमेदवार द्यावा, अशी मागणीही झाली होती. या पार्श्वभूमीवर घाटे यांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल, असा विश्वास होता. मात्र, शनिवारी रासने यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर शहराध्यक्ष घाटे यांनी तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवे, पण 30 वर्षे हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय... अशी पोस्ट समाज माध्यमात टाकत जाहीर नाराजी व्यक्त केली.
भाजप आणि महायुतीच्या नेत्यांनी दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवीन. गेल्या 18 महिन्यांत मी जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. याचे रूपांतर निश्चित विजयात होईल. पालिकेच्या माध्यमातून मेट्रो, समान पाणीपुरवठा, पुण्यदशम, आरोग्य सेवा असेे प्रकल्प मार्गी लावले आहेत. महायुतीतील घटक पक्षांचे पाठबळ असल्याने मोठ्या फरकाने मी विजयी होईन.
- हेमंत रासने, भाजप
पुणे कॅन्टोंमेन्ट विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्याबद्दल मी आमचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ यांचा आभारी आहे. मागील पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर मी या निवडणुकीत मोठ्या मताने विजयी होईन.
- सुनील कांबळे, भाजप