भोर: नीरा देवघर धरणात सोमवारी (दि.12) सकाळी 17.96 टक्के, तर भाटघर धरणात 11.69 टक्के पाणी साठा शिल्लक आहे. भाटघर धरणातून 1795 क्युसेक तर नीरा देवघर धरणातून 750 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कमी-जास्त प्रमाणात सुरु असलेल्या विसर्गामुळे दोन्ही धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊ लागली आहे. त्यामुळे धरण परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत.
भोर तालुक्यातील निरादेवघर, भाटघर धरण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण भरलेले होते. त्यानंतर 4 फेब्रुवारीला भाटघर 77.12, तर नीरा देवघर धरणात 68.28 टक्के पाणी साठा होता. (Latest Pune News)
गतवर्षी 12 मे 2024 ला भाटघर धरणात 8.73 व नीरा देवघर मध्ये 8.19 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा भाटघर धरणात 4 टक्के तर नीरा देवघर धरणात 10 टक्के जास्तीचा पाणीसाठा उपलब्ध आहे.
नीरा देवघर धरणातील पाणीसाठा इतर धरणांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे आकडे वारीवरुन दिसून येत आहे. मागील वर्षी नीरा देवघर धरणातील पाण्याची पातळी खालवल्याने धरण क्षेत्रातील गावांना एप्रिलच्या अखेरीनंतर पाणी टंचाई जाणवली होती.
धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी
धरणांच्या पाणी पातळीत घट होत गेल्यावर उन्हाळ्यात पाणी टंचाई राहणार आहे. तसेच यावर्षीही धरणातून विसर्ग सुरू असल्याने गतवर्षी पेक्षा आज जास्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील काळात टंचाई भासणार नाही याची काळजी घेऊन नीरा देवघर धरणातून योग्य तो विसर्ग करुन धरणात मुबलक पाणीसाठा ठेवण्याची मागणी भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.
भोर तालुक्यात गतवर्षी 20 गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु केला होता. यंदा वारवंड, करंदी खे.बा., साळवडे या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. तर शिंदेवाडीचा प्रस्ताव मंजुरीत असून शिळीम, खुलशी, गृहिणी, उंबर्डे, या गावांचे प्रस्ताव भोर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे आले आहेत. लवकरच हे प्रस्ताव जिल्हाधिकार्यांकडे मंजूरीसाठी पाठवून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल.
- राजेंद्र पिसाळ, कनिष्ठ अभियंता, पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग