भोर: कापुरव्होळ - भोर- मांढरदेवी मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने या वर्षीच्या दिवाळीच्या सणापूर्वी हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी दिली.
एशियन बँक डेव्हलपमेंट मार्फत 330 कोटी रुपये खर्चून कापूरहोळ- भोर- मांढरदेवी- वाई- सुरूर या 64 किलोमीटर मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. 54 किलोमीटरचे काम हे भोर हद्दीत, तर 10 किलोमीटरचे काम हे वाई (जि. सातारा) तालुक्याच्या हद्दीत आहे. (Latest Pune News)
मार्च 2023 मध्ये सुरू झालेल्या या कामाची मुदत फेब्रुवारी 2025 पर्यंत होती, मात्र भौगोलिक परिस्थिती आणि पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ठेकेदार एस. एम. अवताडे यांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत कापूरहोळ ते मांढरदेवीपर्यंत 35 किलोमीटरच्या काँक्रीटीकरणाचे काम आणि गावांना जोडणार्या रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.
भोर शहराजवळ 2 किलोमीटरचे काम हे महावितरणच्या वाहिन्या व पाण्याच्या योजनांमुळे अपूर्ण राहिले आहे. अंबाडखिंड (ता.भोर) घाटातील व गुंडेवाडी (ता.वाई) घाटातील साडेपाच किलोमीटरचे काम हे वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे अपूर्ण आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या वतीने आळंदे येथे महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे.
याशिवाय आवाज व सुरक्षिततेच्या दृष्टीने आळंदे येथे शाळेच्या बाजूला रस्त्याच्या कडेला आणि भोर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या बाजूला मोठी संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. काम पूर्ण झालेल्या मार्गावर दिशादर्शक व चिन्हांकित बोर्ड, रस्त्यांवरील पट्टे आणि संरक्षक कठडे उभारण्याचे काम बाकी आहे. यावर्षी दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होऊन मार्गावरून सुरक्षित आणि योग्य प्रकारे वाहतूक होईल, असा विश्वास मेटेकर यांनी व्यक्त केला.
अपूर्ण राहिलेले कामाची ठिकाणे पुढील प्रमाणे
भोर शहराजवळ 2 किमी.
गोकवडी गावाजवळील 200 मीटर.
आंबाडे खिंड घाटात व गुंडेवाडी घाट 5.5 किमी.
संरक्षक कठडे, दिशादर्शक फलक आणि पट्टे
दोन्ही बाजूने वृक्ष लागवड
रस्त्याला जोडून असणार्या गावातील गटारे
शासनाच्या हद्दीत रखडले काम
कापुरव्होळ - भोर - मांढरदेवी - सुरुर फाट्यापर्यंत अनेक वर्षापासून वाहतूक सुरु आहे. शासनाने रस्त्याचे रुंदीकरण, काँक्रेटीकरणाच्या कामाला निधी देऊनकाम सुरु केले आहे; परंतु हे काम करताना शासनाच्या वन विभागाने हरकत देऊन गोकवडी, आंबाडखिंड घाटात रस्त्याचे काम थांबवले आहे.
एखाद्या शेतकर्याने रस्त्यासाठी हरकत दिली, तर शासन त्यावर फौजदारी खटला दाखल करुन त्याला अटक करण्याची धमकी देते, परंतु कायम वहिवाटीमधील रस्त्याला जर शासनाची हरकत असेल तर कोणावर कारवाई करायची, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून, त्याचा त्रास प्रवाशी , वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. तरी शासनाने याकडे लक्ष देऊन काम मार्गी लावावे, असे नेरे येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल सावले यांनी सांगितले.
कापूरव्होळ - भोर - मांढरदेवी रस्त्याचे काम जवळ जवळ पूर्ण होत आले असल्यामुळे तालुक्यातील पर्यटन स्थळांना विशेष महत्त्व येणार आहे. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झालेली दिसणार आहे. मांढरदेवी - पाचगणी - महाबळेश्वर येथे जाण्यासाठी पर्यटकांना हा मार्ग सोईस्कर होणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपब्लध होतील.
- संग्राम थोपटे, माजी आमदार, भोर विधान सभा