

लोणावळा:
लोणावळा म्हटलं की पर्यटकांची झुंबड आणि गरमागरम चटकदार वडापाव हे समीकरण ठरलेलंच. पण याच प्रसिद्धीच्या नावाखाली जर तुमच्या ताटात सडलेले आणि उंदरांनी कुरतडलेले बटाटे येत असतील तर? लोणावळ्यातील प्रसिद्ध 'चौधरी वडापाव'च्या किचनमधील धक्कादायक दृश्यांनी सध्या खळबळ उडवून दिली आहे. पर्यटकांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ एका तपासणीत उघड झाला आहे
'चौधरी वडापाव' हे लोणावळ्यातील एक नावाजलेलं नाव. पण त्यांच्या किचनमध्ये जे चित्र दिसलं ते अत्यंत किळसवाणं होतं.
सडके बटाटे: वडापावच्या भाजीसाठी चक्क सडलेले, काळे पडलेले आणि उंदरांनी कुरतडलेले बटाटे वापरले जात होते.
घाणीचं साम्राज्य: किचनमध्ये सगळीकडे घाण पसरली होती. झुरळं आणि उंदरांचा तर अक्षरशः सुळसुळाट होता.
नियमांना केराची टोपली: कामगार हँडग्लोव्हज किंवा डोक्यावर टोपी न घालताच पदार्थ बनवत होते. हात धुण्याचीही धड सोय नव्हती.
लोणावळ्याच्या अगदी मध्यवर्ती भागात आणि अनेक हॉस्पिटल्सच्या जवळ हे दुकान आहे. त्यामुळे इथे येणारे पर्यटक, रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमधील कर्मचारी मोठ्या विश्वासाने वडापाव खातात. मात्र, हा प्रकार म्हणजे त्यांच्या विश्वासाचा आणि आरोग्याचा केलेला खेळच आहे.
डॉक्टरांच्या मते, असे दूषित आणि सडलेले अन्न खाल्ल्यास विषबाधा, जुलाब, उलट्या आणि पोटदुखीसारखे गंभीर आजार होऊ शकतात. काहीवेळा यातून जीवघेणा संसर्ग होण्याचाही धोका असतो.
या धक्कादायक प्रकारामुळे लोणावळ्यासारख्या मोठ्या पर्यटनस्थळावरील खाद्यपदार्थांच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या तपासणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ प्रसिद्धीच्या जोरावर ग्राहकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असून, यावर कडक कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.