Two dead bodies found in Aundh
पुणे: औंध येथील ब्रेमेन चौकात महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ सोमवारी (दि.14) सकाळी पावणेदहाच्या सुमारास दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. विनोद क्षीरसागर (29) आणि सौरभ निकाळजे (27) अशी मृतांची नावे असून, त्यांचा मृत्यू खोलीत विजेचा शॉक लागून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ब्रेमेन चौकातील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ असलेल्या महावितरणच्या सिद्धार्थनगर फिडरच्या रिंगमेन युनिट परिसरात हे मृतदेह आढळून आले. मृतांची स्थिती संशयास्पद असल्याने त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विजेचा शॉक लागून मृत्यू झाला, की इतर कोणते कारण जबाबदार आहे, हे पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. (Latest Pune News)
घटनेची माहिती एका स्थानिक व्यावसायिकाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी महावितरणच्या अधिकार्यांशी संपर्क साधून विद्युतप्रवाह बंद केल्यानंतर दोघांचे मृतदेह खोलीतून बाहेर काढण्यात आले. विद्युत निरीक्षकांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, त्यांचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. विनोद हा रिक्षाचालक आहे, तर सौरभ हा खासगी नोकरी करतो.
विनोद रविवारी (दि.13) सायंकाळी साडेपाच वाजता रिक्षा घेऊन घरून निघाला होता. त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तो घरी परतला नाही. त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्याची चतु:शृंगी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदविली होती. सकाळी विनोद याची रिक्षा महावितरणच्या त्या खोलीच्या बाहेर आढळून आली.
मात्र, तो तेथे नव्हता. तांत्रिक तपासात त्याचे शेवटचे लोकेशन त्याच खोलीत पोलिसांना आढळून आले. महावितरणला संपर्क साधून विद्युतप्रवाह बंद केल्यानंतर पोलिसांनी आत जाऊन पाहिले तेव्हा दोघांचे मृतदेह त्यांना आढळून आले. दोघांच्या नातेवाईकांना पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, विनोद आणि सौरभ एकमेकांच्या संपर्कात कसे आले, ते महावितरणच्या डीपीच्या खोलीत कशासाठी गेले होते, याबाबत तपास सुरू आहे.
मुक्त प्रवेश अन् दारूच्या बाटल्या
महावितरणच्या डीपी परिसरात दारूच्या बाटल्या आढळून आल्या असून, अनेक लोक येथे मुक्तपणे वावरताना दिसतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फारशी काळजी येथे घेतली जात नसल्याचे निदर्शनास येते.
महावितरणच्या खोलीत दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, दोघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा. सर्व शक्यता गृहीत धरून पोलिस तपास करत आहेत. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
- उल्हास कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चतुःशृंगी