

पुणे: बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या व्यापार्याला भीमाशंकरच्या जंगलात नेऊन रिक्षाचालकाने चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रिक्षाचालकवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे. या संदर्भात एका 61 वर्षीय व्यापार्याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ते दक्षिण दिल्लीतील बदरपूर परिसरात राहतात आणि व्यवसायाच्या कामासाठी पुण्यात आले होते. शनिवारी (12 जुलै) सकाळी नऊच्या सुमारास ते पुणे रेल्वेस्थानकात आले. (Latest Pune News)
त्यांना बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी जायचे होते. पार्सल कार्यालयासमोर थांबलेल्या एका रिक्षाचालकाला त्यांनी हे सांगितले. रिक्षाचालकाने त्यांना दर्शनासाठी नेण्याचे मान्य केले आणि अगोदरच भाडे ठरवले. सकाळी सव्वानऊच्या सुमारास ते भीमाशंकरकडे रवाना झाले आणि दुपारी एकच्या सुमारास तेथे पोहोचले.
दर्शन झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास पुण्याकडे परतताना, जंगलातील एका रस्त्यावर रिक्षाचालकाने रिक्षा थांबवली आणि व्यापार्याला चाकूचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने 4 हजार 500 रुपये आणि खिशातील 15 हजार रुपये, अशा एकूण 19 हजार 500 रुपयांची लूट केली.
त्यानंतर व्यापार्याला जंगलात सोडून रिक्षाचालक पसार झाला. व्यापार्याने रस्त्यावरून जाणार्या भाविकांना ही माहिती दिली आणि नंतर पुण्यात येऊन बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.