Loksabha election | पुरंदर-हवेलीत मताधिक्य कोणाकडे? घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस

Loksabha election | पुरंदर-हवेलीत मताधिक्य कोणाकडे? घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस
Published on
Updated on

सासवड : पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील 'हाय व्होल्टेज' लढतीत पुरंदर तालुक्यात घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस मताधिक्य घेणार, याची मतदारांना उत्सुकता लागली आहे. या लोकसभा निवडणुकीत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदरमधून सुनेत्रा पवार यांना 50 हजारांचे मताधिक्य देणार, तसेच आमदार संजय जगताप यांनीही सुप्रिया सुळे यांना 50 हजारांचे मताधिक्य देणार, अशी घोषणा केली. परंतु, कोण कोणाला किती मताधिक्य देणार, याचे चित्र येणार्‍या 4 जून रोजी स्पष्ट होईल
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पुरंदरमध्ये मताधिक्यासाठी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, डॉ. दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, बाबा जाधवराव, गंगाराम जगदाळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या नेत्यांनी पुरंदरमधून सुनेत्रा पवार यांना मोठे मताधिक्य मिळेल, असा दावा केला आहे.

पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी नगरपालिका आणि पंचायत समितीच्या आठपैकी दोन गणांवर काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, सुदामआप्पा इंगळे, विजय कोलते, माणिक झेंडे पाटील यांनी आमदार संजय जगताप यांना प्रचारप्रमुख करून त्यांच्या नेतृत्वाखाली पुरंदर तालुक्यातील प्रचाराची रणनीती आखली होती. संजय जगताप हे यात कितपत यशस्वी होतील, ही येणारी वेळ ठरवेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही संजय जगताप यांचे नेतृत्व मान्य करून त्यांना साथ देऊन सुप्रिया सुळे यांना मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला आहे.

पुणे शहराला लागून असलेली 18 गावे या मतदारसंघात जोडलेली आहेत. या गावातून भाजप-शिवसेनेचा मतदारवर्ग मोठा आहे. या 18 गावांवरच पुरंदरच्या विधानसभेचा निकाल शिवसेनेच्या बाजूने गेल्या दोन निवडणुकांतून दिसून आला आहे. त्याचबरोबर पुरंदर तालुक्यावर माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचाच वरचष्मा आहे. तालुक्याची पंचायत समितीच्या आठपैकी पाच गणांवर आणि जिल्हा परिषदेच्या चार गटांपैकी तीन गटांवर सेनेचे प्रभुत्व आहे, तर एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटा)कडे आहे. यामुळे घड्याळाला मोठे मताधिक्य मिळेल, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

पुरंदरमध्ये महायु्तीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सभा झाल्या व महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या सभा झाल्या. यात तालुक्यातील रखडलेले व कळीचा मुद्दा असलेले गुंजवणीचे पाणी, पुरंदर विमानतळ, जेजुरी औद्योगिक वसाहत वस्तीकरण हडपसर असे अनेक मुद्दे गाजले. विमानतळबाधित गावांतील मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतात, हे येणार्‍या 4 जूनला कळेल. परंतु, सध्या मात्र मताधिक्याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news