खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याची टंचाईच्या झळा! | पुढारी

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पाण्याची टंचाईच्या झळा!

कडूस : पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे नागरिकांसह जनावरांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. निवडणुकीमुळे पाणीटंचाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने मे, जून महिना कसा जाणार? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कोहिंडे बुद्रुक, गारगोटवाडी, वाजवणे, औदर, देओशी, येणेये, वाशेरे, साकुर्डी, तळवडे आदी गावांतील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाण्यासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. निवडणुकीच्या प्रचारात सर्वपक्षीय नेत्यांनी येथील पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवू, अशी आश्वासने दिली आहेत. मात्र, पाणी देण्यासाठी कोणीच पुढे येत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

वाशेरे, वाजवणे, साबुर्डी, देवोशी, औदर आदी भागांतील विहिरींनी तर फेब्रुवारी महिन्यात तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. वाशेरे, वाजवणेसह औदर, येणिये, कुडे येथील छोटे-मोठे तलाव कोरडे पडलेले आहेत. त्यामुळे या तलावावर आधारित असलेल्या शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत. वाशेरे, औदर, वाजवणे, कोहिंडे आदी भागांत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. परंतु, येथील तलाव आणि विहिरी मात्र उन्हाळ्यात नेहमीच कोरड्या पडतात.
ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, लहान मुले मिळेल त्या भांड्यात पाण्यासाठी मैलोन् मैल भटकत आहेत. या भागात टँकरची मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पाण्याच्या टंचाईमुळे अनेक नागरिक हे गाव सोडून खेड, चाकण, तळेगाव, म्हाळुंगे आदी ठिकाणी तात्पुरते स्थलांतरित झाले आहेत.

हेही वाचा

Back to top button