Loksabha election | सेलिब्रिटीविरुद्ध जनतेतील नेता; शिरूरमध्ये जुनी लढत पण फासे उलटे !

Loksabha election | सेलिब्रिटीविरुद्ध जनतेतील नेता; शिरूरमध्ये जुनी लढत पण फासे उलटे !

शिवनेरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात अखेर महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन लढविण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात जुनीच म्हणजे शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशीच लढत होणार आहे. उमेदवार जुनेच असले तरी या निवडणुकीत राजकीय फासे मात्र उलटे पडले असून, सन 2019 च्या तुलनेत परिस्थिती पूर्णपणे वेगळी झाली आहे. यामुळे बारामतीद्सोबतच शिरूरच्या लढतीकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वाधिक ताकद असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांना सक्षम उमेदवार न मिळाल्याने दुसऱ्या पक्षातील उमेदवार पळविण्याची वेळ आली, ही वस्तुस्थिती आहे. शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आपला उमेदवार उभा करेल आणि कोल्हे यांचा पराभव करून निवडून देखील आणेल, अशी गर्जना अजित पवार यांनी केल्यापासूनच शिरूर लोकसभेचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली, परंतु गेले दीड ते दोन महिने अजित पवार यांना उमेदवार मिळत नव्हता. अजित पवार एखादा नवा चेहरा देऊन कोल्हे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करतील, अशी अपेक्षा असताना आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यातच अखेर पक्ष कोणताही असो आपण निवडणूक लढविणारच हा शब्ददेखील आढळराव पाटील यांनी खरा करून दाखवला.

पाच वर्षांपूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध डॉ. अमोल कोल्हे अशी लढत झाली होती, त्या वेळी कोल्हे यांनी देखील खासदारकीसाठी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत हातात घड्याळ बांधले होते, आता शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटाच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत घड्याळ हातात घेतले आहे. सन 2019 च्या निवडणुकीत कोल्हे यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय डाव टाकला व जिंकला देखील. नवीन तरुण चेहरा, सेलिब्रेटी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला उमेदवार तसेच अजित पवार यांनी कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे कोल्हे यांचा विजय सोपा झाला. सलग तीन वेळा खासदार राहिल्याने आढळराव पाटील यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड 'एंटी इनकम्बेंसी' निर्माण झाली.

आढळराव पाटील यांचा अतिआत्मविश्वास आणि शेवटच्या टप्प्यात गाफील राहिल्याने देशभरात मोदी लाट असताना कोल्हे यांनी मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला. गेल्या पाच वर्षांत राज्यात व शिरूर लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती बदलेली आहे. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कोल्हे गेले पाच वर्षे मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत. लोकसंपर्काचा अभाव हा फार मोठा मुद्दा या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा राहणार आहे. गेले पाच वर्षांत मतदारसंघात कोणताही मोठा व ठोस प्रकल्प आणण्यात कोल्हे अपयशी ठरले आहेत.

याउलट आढळराव पाटील कोणतीही सत्ता, पद नसताना पाच वर्षे सतत लोकांच्या संपर्कात राहिले, कोरोना काळात लोकांना भक्कम आधार देत मोठी मदत केली. कोल्हे यांना या निवडणुकीत शरद पवार यांच्या सहानुभूतीची फायदा होऊ शकतो, पण राष्ट्रवादी काँग्रेससारखी यंत्रणा उभी करणे मोठे कठीण काम करावे लागणार आहे. तर आढळराव पाटील यांची स्वतःची, शिवसेना पक्षाची व अजित पवार यांचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा आणि 'अब की बार 400 पार' करण्यासाठी भाजपची जिवाचे रान करण्याची असलेली तयारी या आढळरावांच्या जमेच्या बाजू आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news