

गणेश विनोदे
वडगाव मावळ(पुणे) : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याबाबत दिलेले संकेत, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांना प्रदेश कार्यकारिणीत मिळालेली संधी आणि तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्यावर सोपविण्यात आलेली मावळ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी या घडामोडींमुळे मावळ भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे लवकरच तालुका पातळीवर खांदेपालट होण्याच्या हालचाली सुरू असल्याने मावळात भाजप आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अक्टिव्ह मोडवर असल्याचे दिसते. सलग 25 वर्षे तालुक्यावर एकहाती सत्ता राखलेल्या भाजपचा चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 94 हजारांच्या फरकाने पराभव झाला आणि सातत्याने पराभव होत असलेल्या राष्ट्रवादीला नवचैतन्य मिळाले व भाजपवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली.
चार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत इच्छुक असलेल्या रवींद्र भेगडे यांना पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पराभवाने खचलेल्या परिस्थितीत कार्यकर्ते असताना मिळालेली जबाबदारी रवींद्र भेगडे यांनी विश्वासाने सांभाळली. विधानसभा निवडणुकीसाठीही ते इच्छुक असून पक्षाने त्यांच्यावर मावळ विधानसभा मतदारसंघ प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे.
दरम्यान, दहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर घडले आणि भाजप व शिंदे गट सत्तेवर आले व या सत्तांतराचा परिणाम मावळ तालुक्याच्या राजकारणावर प्रकर्षाने झाला. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. लगेचच त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी संधी देण्यात आली व विकास निधी वाटपाची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली.
तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांचा कार्यकाल संपला असल्याने व त्यांची विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आल्याने पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदावर लवकरच नवीन कार्यकर्त्याला संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, रवींद्र भेगडे यांनी पडत्या काळात पक्ष सांभाळल्याने तसेच त्यात दोन वर्षे कोरोनाची गेल्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी द्यावी, अशीही मागणी होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खांदेपालट करावे, अशीही चर्चा भाजपच्या गोटात आहे.
याशिवाय लोकसभा प्रवास योजनेचे प्रमुख, प्रदेश कार्यकारिणीत उपाध्यक्ष अशी संघटनात्मक जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली. भेगडे यांनीही वरिष्ठांनी सोपवलेली जबाबदारी विश्वासाने सांभाळली असल्याने भेगडे यांचे पक्ष संघटनेत दिवसेंदिवस वजन वाढत असल्याचे दिसते. माजी राज्यमंत्री भेगडे यांच्यासह जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांची पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, ग्रामीण भागातील जितेंद्र बोत्रे यांचीही प्रदेश कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील तीन जणांना प्रदेशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तळेगाव दाभाडे येथील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी माजी मंत्री भेगडे यांच्या कामाचे कौतूक करून भेगडे यांचा लवकरच पदसत्कार होणार असल्याचे सूतोवाच केले. पालकमंत्री पाटील यांच्या या वक्तव्यामुळे भेगडे यांना राज्याच्या मंत्रिमंडळात किंवा महत्त्वाच्या महामंडळावर संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून, लवकरच मावळात लाल दिवा येण्याची चर्चा सोशल मीडियावर व भाजपच्या गोटात सुरू आहे.
हेही वाचा