Arrest demand Rajendra Hagwane
पुणे: अटक करा, अटक करा, राजेंद्र हगवणेला अटक करा..., मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनामा द्या...! अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आक्रमक पवित्रा घेत पुण्यातील बालगंधर्व चौकात आंदोलन केले.
वैष्णवी हगवणेची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकाराचा तपास सीआयडीमार्फत करून जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवले जावे, अशी मागणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे बालगंधर्व चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (Latest Pune News)
या प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याला वैष्णवीची हत्या कधी होणार आहे, हे माहिती होते. त्याच्या व हगवणेच्या घरात अर्ध्या तासांचे अंतर असताना देखील वैष्णवीचा मृतदेह दवाखान्यात नेल्यावर तिचे बाळ पळवण्यात आले.
ही बाब लक्षात आल्यावर माध्यमांनी दबाव आणल्यावर चव्हाण याने हे बाळ परत केले, त्यामुळे ही घटना प्री प्लॅन असून नीलेश चव्हाण व हगवणे कुटुंबीयांचे सीडीआर तपासण्यात यावे, ही आमची मागणी आहे. दरम्यान, ज्येष्ठ नेते व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे हगवणेचा बचाव करताहेत हे दुर्दैव म्हणावे लागेल, अशी टीका जगताप यांनी यावेळी केली.तसचे कोणत्याही लग्नात जाताना आता दादांनी विचार करावा,असा टोला देखील प्रशांत जगताप यांनी लगावला.