

Bhumi Abhilekh staff on strike
पुणे: भूमिअभिलेख विभागातील कर्मचार्यांचा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तांत्रिक वेतनश्रेणीचा प्रश्न शासनाकडून सोडविण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही, असा पवित्रा भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेने घेतला आहे. दरम्यान, येत्या सोमवारपासून (दि.26) भूमिअभिलेख विभागातील नागपूर व अमरावती विभागातील कर्मचारीही ‘काम बंद’ करून संपात सहभागी होणार आहेत.
भूमिअभिलेख कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य भूमिअभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग या संघटनेने गुरुवारी (दि. 15) बेमुदत ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले आहे. (Latest Pune News)
त्यामुळे भूमिअभिलेखच्या पुणे विभागातील सर्वच कार्यालयांचे कामकाज ठप्प पडले असून, कार्यालये ओस पडली आहेत. तर, पुणे विभागातील सर्व मोजण्या सध्या बंद आहेत. दरम्यान, पुण्यातील भूमिअभिलेख कार्यालयाबाहेर आंदोलनाने जोर धरला असून, सातव्या दिवशीही आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
संघटनेचे सरचिटणीस अजित लांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमिअभिलेख विभागातील कर्मचार्यांना तांत्रिक वेतन श्रेणी देण्याकरिता शासनाने तत्कालीन जमाबंदी आयुक्त एन. के. सुधांशू यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीकडून अहवाल मागितला होता. त्याला जवळपास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला.
परंतु, अद्याप त्या अहवालावर शासनाने कोणताही निर्णय घेतला नाही, त्यामुळे राज्यभरातील कर्मचार्यांमध्ये वेतनश्रेणीच्या प्रश्नावर तीव्र असंतोष आहे. भूमिअभिलेख खात्यामधील कर्मचार्यांच्या सेवा भरती नियम शासनाने 2012 मध्ये दुरुस्ती करून सर्व पदाकरिता तांत्रिक अर्हता निश्चित केल्यामुळे 2012 पासून या खात्यामधील सर्वच पदांकरिता बीई सिव्हिल डिग्री, सिव्हिल डिप्लोमा अशी शैक्षणिक अर्हता लागू केल्यामुळे या खात्यात सर्व पदांवर तांत्रिक अर्हताप्राप्त केलेल्या कर्मचार्यांनाच नियुक्ती दिल्या जातात.
परंतु, या पदाकरिता पगार हा कारकून संवर्गातील दिला जात असल्यामुळे कर्मचारीवर्गात तीव्र असंतोष आहे. दरम्यान, उपसंचालक भूमिअभिलेख यांच्याव्दारे राज्य शासनाकडे मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले असून, आता शासनाकडून चर्चेसाठी कधी बोलाविण्यात येते, याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही लांडे यांनी सांगितले.