चला भेदूया व्यसनांचा चक्रव्यूह : आठवी, नववीपासूनच व्यसनांची संगत

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोबाईलमुळे हातात एकवटलेले जग, सतत काहीतरी वेगळे करून पाहण्याची इच्छा आणि मित्र-मैत्रिणींमधून येणारे 'पिअर प्रेशर' अशा कारणांमुळे आठवी, नववीपासूनच मुलांची व्यसनांशी मैत्री होत आहे. व्यसनी पदार्थांची सहज होणारी उपलब्धता हे यामागचे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. आताच्या जगात मुलांना लहानपणापासूनच स्पर्धेला तोंड द्यावे लागते. आर्थिक स्थिती सुधारल्याने अनेक सुख-सुविधा पायाशी लोळण घेत असतात. मोबाईलच्या सततच्या वापराने रिल्स, शॉट्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यावरून जगात काय चालले आहे, हे सहज मुलांपर्यंत पोहोचते. त्यातूनच व्यसनांच्या विविध प्रकारांशीही मुलांची ओळख होते. अगदी उच्चभ्रू वर्गापासून निम्नस्तरापर्यंत सर्व गटांतील मुलांसमोर व्यसनाधीनतेचा भूलभुलैया आ वासून उभा राहिला आहे.

सायबर अभ्यासक मुक्ता चैतन्य म्हणतात, ऑनलाइन माध्यमातून ड्रग ट्रॅफिकिंग होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरील 'ग्रुमिंग' ही डोकेदुखी ठरत आहे. यामध्ये इंटरनेटमुळे प्रौढ व्यक्ती तरुणांच्या संपर्कात येतात, त्यांच्याबरोबर मैत्री वाढवतात. भेटीगाठी होऊन विश्वास संपादन केला जातो आणि मग किशोरवयीन मुलांचा, तरुणांचा ड्रग ट्रॅफिकिंगसाठी वापर करून घेतला जातो. ज्या मुलांना या सवयी लागतात, ते इतरांना यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करतात आणि ही साखळी वाढत राहते.

व्यसन हा छंद किंवा आवड नसून आजार आहे. एकदा व्यसनांची सवय लागली की चांगले आणि वाईट यातील फरक ओळखण्यासाठी प्रत्येक वेळी सदसद्विवेक काम करेल असे नाही. आजकाल मुलांवर 'पिअर प्रेशर' निर्माण झाल्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी असे मार्ग निवडले जातात. व्यसनी पदार्थांच्या भवताली असलेली प्रचंड उपलब्धता हे यामागचे मूळ कारण आहे. व्यसनाधीनतेला दूर करण्यासाठी जनजागृती करायलाच हवी; मात्र, अमली पदार्थ उपलब्धच होणार नाहीत, याबाबत यंत्रणांनी काम करणे हा रामबाण उपाय आहे.

– मुक्ता चैतन्य, संचालिका, सायबर मैत्र

तरुणांना सतत नवीन काहीतरी करून पाहण्याची इच्छा असते. स्वत:ची प्रतिमा चुकीच्या मार्गाने उजळण्यासाठी तरुणाई बरेचदा व्यसनांचा आधार घेते. एकदा करून पाहायला काय हरकत आहे, या विचारातून व्यसनाकडे पावले वळतात. एकदा अमली पदार्थांमुळे मेंदूला आनंद मिळाला की त्याची सवय लागते. स्पर्धा परीक्षेला सामोरी जाणारी मुले, नातेसंबंध, शिक्षण, करिअर यातील तणाव याचे पर्यवसन व्यसनाधीनतेमध्ये होते. पालक खूप कडक असतील तर मुले बाहेर मुक्त होण्याचा प्रयत्न करतात, बाहेरगावी शिकायला आल्यावर बंधने राहात नाहीत. पालकांनी मुलांवर सतत संवाद साधत राहायला हवे. समुपदेशनाच्या मदतीनेही व्यसनाधीनतेतून मार्ग काढता येऊ शकतो.

– डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news