वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचा पालघरपर्यंत विस्तार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूचे काम प्रगतीपथावर असून त्या मार्गाचा विस्तार पालघरपर्यंत करण्यात येईल. तसेच मुंबईतील विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्ग ठाणे शहरापर्यंत नेला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केली. तसेच मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लागणार्‍या भूसंपादनाचे कामही पूर्ण झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात सार्वजनिक उपक्रम, विशेष हेतू कंपन्या, महापालिका यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प हाती घेऊन ते कालबद्धरीत्या पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली. भारतातील सर्वाधिक, 22 किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग, अटलबिहारी महानगर वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूचे लोकार्पण आणि ऑरेंज गेट ते मरीन क्षेत्रातील कामे ड्राईव्हपर्यंत किनारी मार्गाला जोडणार्‍या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. नरिमन पॉईंट ते वरळी या 11 किलोमीटर लांबीच्या किनारी मार्गाचे काम अंतिम टप्प्प्यात असून या मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत सुमारे 70 टक्के आणि इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब येथे सुसज्ज जेट्टीचे, 229 कोटी 27 लाख रुपये किमतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशात उभारण्यात येणार्‍या 337 किलोमीटर लांबीपैकी 263 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका मंजूर असून 46.5 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर मेट्रोचा प्रवास सुरू झाला आहे. या मार्गावर सुमारे सहा लाख प्रवासी दररोज या सुविधेचा लाभ घेत आहेत. नवी मुंबई विमानळाचे काम वेगाने सुरू असून त्याचा पहिला टप्पा मार्च 2025 पर्यंत सुरू होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

वरळी येथे अत्याधुनिक प्रशिक्षण व कौशल्य विकास भवन तसेच वडाळा येथे वस्तू व सेवा कर भवनाची इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तर मुंबईतील गिरगाव येथे मराठी भाषा भवनाचे कामही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news