पुणे
बारामतीतील गुन्हेगारी आटोक्यात आणू ; पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांचे प्रतिपादन
बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर व परिसरात गेल्या काही दिवसांत विविध गुन्हे घडत आहेत. परंतु, गेल्या तीन वर्षांचा विचार करता गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच गुन्हेगारी आटोक्यात आणू, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी व्यक्त केला. बारामतीला त्यांनी मंगळवारी (दि. 22) भेट दिली, त्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अपर पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह विविध पोलिस ठाण्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.
गोयल म्हणाले की, बारामतीतील वाढते गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यापूर्वीच्या गुन्ह्याची उकल क?ण्यात स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाण्यांना यश येत आहे. घरफोड्यांप्रकरणी काहींना अटक केली आहे. येथे पडलेल्या 1 कोटी 7 लाखांच्या दरोड्याची उकल करण्यात आली आहे. त्यात मोठी रक्कम हस्तगत केली आहे. 20 तोळ्यांचे दागिने आहे तसे मिळाले. पेट्रोल पंप व्यवस्थापकाला लुटण्याचा प्रयत्न करणार्यालाही अटक करण्यात आली. गुन्हे घडूच नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दारू पिऊन वाहने चालविणार्यांवर दर शनिवारी, रविवारी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. रस्त्यालगत वाहने लावणार्यांवर खटले भरले जात आहेत. पेट्रोलिंगवर मोठा भर देण्यात आला आहे.
सायबर व आर्थिक गुन्ह्यांचा प्रत्येक पोलिस ठाण्यात विभाग
सायबर गुन्हे वाढत आहेत. त्याबाबत जनजागृतीसाठी आम्ही सायबर सुरक्षा दिंडीच्या माध्यमातून प्रबोधन केले. सायबर गुन्हे करणे सोपे झाले आहे. परंतु, त्याचा तपास करायचा झाला तर चार ते पाच राज्यांत जावे लागते. गुन्ह्यांचे प्रकार बदलत आहेत. त्यामुळे आता जिल्हास्तरावरील हा विभाग व आर्थिक गुन्हे शाखांचा विभाग पुढील काळात प्रत्येक पोलिस ठाण्यात निर्माण करावा लागेल, असे गोयल यांनी सांगितले.
बारामतीत लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे
बारामती शहरातील सीसीटीव्ही कॅमेर्याचा प्रस्ताव सध्या मंत्रालयात आहे. मंजुरी मिळताच निविदा प्रक्रिया करीत कॅमेरे बसविले जातील; परंतु मोठ्या सोसायट्या, मॉल, दुकाने, शोरूम, व्यावसायिक यांनी सुरक्षेसाठी कॅमेरे बसविणे गरजेचे असल्याचे गोयल म्हणाले.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यास कारवाई
सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा लोकांवर कारवाई केली जात आहे. जातीय तेढ निर्माण करणारे स्टेटस ठेवल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर असे स्टेटस ठेवू नयेत, असे आवाहन गोयल यांनी केले.
जिल्ह्याला 670 कर्मचारी मिळणार
नवीन भरतीद्वारे जिल्ह्याला 670 कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यात माळेगाव, सुपा, निरा नरसिंहपूर आदी नवीन पोलिस ठाणी अस्तित्वात येत आहेत. याशिवाय बारामतीच्या उपमुख्यालयासाठी 300 कर्मचारी मंजूर आहेत. त्यामुळे आगामी काळात बारामती विभागाला मोठे मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा :

