

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये लम्पी आजाराने गेल्या दहा दिवसांत 3 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 15 ते 16 जनावरे ही आजाराने बाधित झाली आहेत. महापालिका पशुवैद्यकीय विभागाकडून बाधित जनावरांवर उपचार सुरू आहे. तर, निरोगी जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. लम्पी आजाराची साथ शहरात सध्या नियंत्रणात असली तरीही गेल्या दहा दिवसांमध्ये 15 ते 16 जनावरांना त्याची लागण झालेली आहे. महापालिका पशुवैद्यकीय विभागाकडून सध्या लसीकरणासाठी एक आणि उपचारासाठी एक अशी दोन पथके नियुक्त आहेत. त्यांच्यामार्फत जनावरांवर लसीकरण व उपचार सुरू आहे. बाधित जनावरांच्या गोठ्यात जाऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. प्रामुख्याने चिखली, जाधववाडी, मोशी, निगडी या पट्ट्यात बाधित जनावरे आढळत आहेत.
लम्पी आजाराने बाधित नसणार्या जनावरांसाठी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारपर्यंत (दि. 21) 250 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले होते. एकूण 3 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे पशुवैद्यकीय विभागाचे उद्दिष्ट आहे. पुढील 15 दिवसांत हे लसीकरण पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी दिली.
शासनाकडून एक पथक
जनावरांना लम्पी आजार प्रतिबंधक लसीकरणासाठी राज्य शासनाकडून एक पथक मदतीसाठी मिळणार आहे. त्यामुळे लसीकरणाला गती येऊ शकेल. सध्या दररोज 35 ते 40 जनावरांना लसीकरण केले जात आहे. ही गती वाढवून दररोज 50 ते 60 जनावरांना लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
लम्पी आजाराबाबत लवकर करावे उपचार
निगडी-यमुनानगर, स्कीम नंबर 10, सुवर्णयुग मित्र मंडळ चौकात सोमवारी (दि. 21) दुपारी एका गायीचा मृत्यू झाला. लम्पी आजाराबाबत सर्व गाय, वासरू यांचे लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी केली आहे.
हेही वाचा :