नानगाव : भीमा नदीपट्ट्यात वाढताहेत बिबट्यांची कुटुंबे

नानगाव : भीमा नदीपट्ट्यात वाढताहेत बिबट्यांची कुटुंबे

नानगाव(पुणे) : दौंड तालुक्यातील भीमा नदीपट्ट्यात व बागायती भागात दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. पूर्वी हा भाग द्राक्षपिकांसाठी प्रसिद्ध होता. त्यानंतर उसाचा परिसर म्हणून ओळखला जाऊ लागला, तर सध्या या भागात बिबट्यांचा परिसर म्हणून ओळख पुढे येत असल्याची वस्तुस्थिती आहे. दिवसेंदिवस वाढणारी बिबट्यांची व त्यांच्या कुटुंबांची संख्या गावागावातील नागरिकांची ज्याप्रमाणे डोकेदुखी ठरत आहे, त्याचप्रमाणे वन विभागापुढेदेखील मोठे आवाहन उभे ठाकले आहे. त्यामुळे येणार्‍या काळात वन विभागाला मोठ्या प्रमाणावर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

बिबट्यांची कुटुंबे वाढीसाठी या भागात पोषक वातावरण आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसशेती असल्याने त्यांना बाराही महिने निवारा उपलब्ध आहे. नदीचा व बागायती पट्टा असल्याने पाणीदेखील मुबलक प्रमाणावर आहे, तर मोठ्या प्रमाणावर शेतकरी असल्याने गोपालन केले जाते. त्यामुळे छोटी-मोठी जनावरे, कुत्रे, रानडुक्कर मोठ्या प्रमाणावर आहेत.

याआधी अनेकदा या भागातील शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या, छोटी जनावरे, पाळीव कुत्रे यांच्यावर बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत, तर काही दिवसांपूर्वी नानगाव (ता. दौंड) येथील मांगोबामाळ परिसरातील खळदकरवस्ती येथील शेतमजुरावरदेखील बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा सध्या या भागात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

भीमा नदीकाठचा भाग हा बागायती शेतीचा पट्टा म्हणून ओळखला जातो तसेच अनेकदा दिवसा वीज नसल्यामुळे या भागात शेतकरी रात्रीचेदेखील शेतात पाणी देण्यासाठी जात असतात. अशावेळी देखील शेतकर्‍यांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन घडत असते. त्यामुळे जर सध्या माणसावर बिबट्याचे हल्ले होऊ लागले, तर बिबट्याची भीती आणखी वाढणार आहे. त्यामुळे बिबट्यांची वाढती संख्या पाहता वन विभागापुढे याचे मोठे आवाहन असणार आहे.

या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये राहत आहेत. घराकडे जाण्यासाठी कच्च्या, शेतातून तर मोठमोठ्या उसामधून घराकडे जावे लागते. त्यामध्ये मोठी माणसे तर लहान मुलांचीही वर्दळ असते. तसेच शेतात शेतकरी व शेतमजूरदेखील दिवसभर कामे करीत असतात. रात्री-अपरात्री शेतकरी घरी जात असतात, त्यामुळे सध्या या भागात बिबट्याच्या भीतीचे वातावरण दिसून
येत आहे.

बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता वन विभागामार्फत पिंजरे मागणीसाठी वरिष्ठपातळीवर पत्रव्यवहार करण्यात येत आहे तसेच नागरिकांमध्ये जाऊन जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. ज्या भागात बिबट्याचा वावर आढळून येत आहे, अशा भागांत गस्तदेखील घातली जात आहे. तरीदेखील नागरिकांनी काळजी घ्यावी, एकट्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अंगणात झोपू नये, रात्रीच्या वेळी शेतात जाताना हातात बॅटरी, काठी व दोन-तीन व्यक्तींनी एकत्रित जावे.

कल्याणी गोडसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, दौंड

वन विभागामार्फत गावागावांत जाऊन सुरक्षतेसंदर्भात माहिती दिली पाहिजे तसेच वन खात्याच्या अधिकार्‍यांनी नागरिकांशी समन्वय साधणे गरजेचे आहे.

मंगेश फडके, शेतकरी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news