

पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. वाढत्या चुका आणि नागरिकांकडून होत असलेल्या हरकतींची दखल घेत निवडणूक आयोगाने तक्रार नोंदणीसाठी सहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 3 डिसेंबरपर्यंत नागरिकांना हरकती व त्रुटी नोंदविता येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली. बुधवारी संध्याकाळपर्यंत 3,343 हरकती आणि त्रुटी यादीवर नोंदविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा 41 प्रभागांत होणार आहेत. या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी 27 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. मात्र, मतदार यादीत नावांच्या दुबार नोंदी, प्रभाग संकेतातील बदल, तर काही नागरिकांची नावे इतरच विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघांत आढळल्यासारखे अनेक प्रकार समोर आले. त्रुटी वाढत असल्याचे लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने त्वरित सुधारणा सुचवून मुदतवाढ दिली आहे.
यासंदर्भातील आदेश सचिव सुरेश कांकाणी यांनी जारी केले आहेत. प्रारूप यादी काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध झाली असली, तरी संगणकीय विभाजन प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक चुकांमुळे यादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी राहिल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर मुदतवाढ देण्यात यावी, या मागणीला वेग आला होता. महाविकास आघाडीच्याही प्रतिनिधींनी आयोगाकडे मुदतवाढीची अधिकृत मागणी केली होती. त्यानुसार आता हरकत व दुरुस्ती नोंदणी 3 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे. नव्या मतदार यादी कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत 5 दिवसांनी वाढविण्यात आली आहे. 10 डिसेंबर रोजी ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, तर मतदान केंद्रांची यादी 15 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्रनिहाय अंतिम यादी 22 डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे.
मतदार याद्यांतील प्रचंड त्रुटींच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक बोलावली. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे, चुका न ठेवता यादी तंतोतंत दुरुस्त करण्याचे निर्देश आयुक्त राम यांनी दिले. निवडणुकीत मताधिक्य कमी असते, त्यामुळे प्रत्येक नाव व तपशील अचूक ठेवण्याचे महत्त्व त्यांनी या बैठकीत अधोरेखित केले.
मतदार यादीतील तक्रारींवर सातत्याने काम सुरू असून, ज्या नोंदी चुकीच्या प्रभागात गेल्या आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. काही भागांत अधिकारी प्रत्यक्ष तपासणी करून चुकीची नावे वगळत आहेत. लवकरच त्रुटीमुक्त यादी तयार केली जाईल.
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
हरकत नोंदविण्यास गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला कर्मचाऱ्यांनी केली अरेरावी
निवेदन घेण्यास केली टाळाटाळ; काँग्रेसचा निवडणूक विभागावर सवाल
पुणे : मतदार यादीतील दुबार नावे व गोंधळावर आक्षेप नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात गेले असता तेथील एका अधिकाऱ्याने त्यांचे निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मतदार यादीत एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे गेले असतील, तरच यादी दुरुस्त करता येते, असे म्हणत अरेरावी केल्याचा आरोप देखील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक 36 सहकारनगर-पद्मावती येतील मतदार यादीत घोळ असल्याने यासंदर्भात आक्षेप नोंदविण्यासाठी धनकवडी क्षेत्रीय कार्यालयात कॉंग्रेसचे पुणे शहर जिल्हा काँग््रेासचे उपाध्यक्ष सतीश पवार, ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे, सोनकांबळे, हरिश यादव, रवी ननावरे आदी पदाधिकारी गेले होते. या वेळी त्यांची भेट भिलारे नावाच्या अधिकाऱ्यांशी झाली. त्यांनी मतदार यादीतील त्रुटींसंदर्भात हरकत नोंदवली. मात्र, त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांनी आधी दुरुस्ती होऊ शकत नसल्याचे उत्तर दिले. तसेच पदाधिकाऱ्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर भिलारे यांनी मतदारविषयक अधिकारी सुहास महाजन यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला.
काँग्रेसचे प्रतिनिधी स्वतः महाजनांशी संवाद साधताच अखेर निवेदन स्वीकारण्यात आले. दरम्यान, या पथकाने बीएल (भाग यादी) मागितली असता ती उपलब्ध नसल्याचे भिलारे यांनी सांगितले. त्यामुळे प्रभाग क्रमांक 36 मधील मतदार याद्या नेमक्या कशा पद्धतीने फोडल्या गेल्या? त्या कोणाच्या आदेशाने तयार केल्या? यात झालेल्या तांत्रिक त्रुटींना जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न कॉंग्रेसच्या पदाधिकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. मतदार यादीत वारंवार त्रुटी, दुबार नावे, स्थानांतरणातील बेताल कारभार समोर येत असतानाही सर्वसामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांंनी मत व्यक्त केले. अधिकारीच मनमानी कारभार करीत असतील तर जनतेने न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? असा सवाल त्यांनी केला.