

ओतूर : पोस्को व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला ओतूर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती ओतूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १५ मे २०२५ रोजी खामुंडी (ता. जुन्नर) येथील रहिवासी मारूती मनोहर कदम (वय ६१) यांनी ओतूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. खामुंडी येथेच रहाणारे विजय हरिदास फलके (वय ४०) आणि त्याची पत्नी पुनम (वय ३४) तसेच त्यांची अल्पवयीन मुलगी तसेच आणखी एक अनोळखीने फिर्यादी कदम यांना पोस्को व बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रूपये खंडणी मागीतल्याची गंभीर घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याबाबत ओतूर पोलीस ठाण्यात दि. १५ मे २०२५ रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार आरोपींनी अल्पवयीन मुलीचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली व फिर्यादी यांचेकडुन दिड कोटी रूपयांचे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे तीन चेक घेतले असून उर्वरित ५० लाख रूपयांची कदम यांचेकडे वारंवार मागणी केली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती- पत्नी यांनी सत्र न्यायालय जुन्नर येथे अटकपूर्व जामिन मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळुन लावला. त्यानंतर पती-पत्नीने अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालय मुंबई येथे देखील अर्ज केला. उच्च न्यायालय मुंबई येथे या अर्जावर २० वेळा सुनावणी झाली.
तेथेदेखील या दाम्पत्याचा अटकपूर्व जामिन मंजुर न झाल्याने या पती-पत्नीने सोमवारी (दि. २४) ओतूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पन केल्याने त्यांना या गंभीर गुन्हयात अटक करण्यात आले आहे. ओतूर पोलिसांनी त्यांना अटक करून मंगळवारी (दि. २५) जुन्नर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने विजय हरिदास फलके यास ७ दिवस पोलीस कोठडी मंजुर केली आहे. आरोपी विजय हरिदास फलके याने अशाच प्रकारचे गुन्हे इतर ठिकाणी केले आहेत का? याबाबत ओतूर पोलिस सखोल तपास करीत आहेत.
पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक लहु थाटे हे या घटनेचा तपास करीत आहेत.