

राहू(पुणे); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील राहू बेट परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी (दि. 4) रात्री एका बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याचा फडशा पाडला. या घटनेने परिसरात घबराट पसरली असून, तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राहू येथील माधवनगरमधील राजेंद्र ज्ञानोबा कुल यांच्या मालकीच्या गायीच्या वासरावर बिबट्याने गुरुवारी रात्री हल्ला केला.
यामध्ये वासराचा जागीच मृत्यू झाला. याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी माधवनगर येथीलच महेंद्र हरपळे यांच्या फार्महाऊसमध्ये बिबट्याने कोंबड्यांचा फडशा पडला होता. तसेच संदीप कुल यांच्याही कुत्र्याला बिबट्याने ठार मारले. गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत आहे. अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्यांनी हल्ले केलेले आहेत. यामध्ये शेतकर्यांचे नुकसान होत असून, जीवितालाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे
वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्यांना पकडण्याची मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
हेही वाचा