पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत्या शुक्रवारी (20 जून) पुणे शहरात मुक्कामी येणार आहे. या पार्श्वभूमीवर वारीच्या नियोजनासाठी गेल्या काही दिवसांपासून महापालिका आणि पोलिस विभागामार्फत सातत्याने विविध पातळ्यांवर बैठकांचे आयोजन सुरू आहे.
मात्र, या बैठका वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या पुढाकारातून स्वतंत्रपणे होत असल्यामुळे महापालिकेतील विभागप्रमुख दिवसभर कार्यालयांपासून दूर राहत आहेत. त्यामुळे कार्यालयांत शुकशुकाट असून, विविध कामांसाठी कार्यालयात येणार्या नागरिकांची मात्र गैरसोय होत आहे. (Latest Pune News)
दरवर्षीप्रमाणे वारीसाठी महापालिका आणि पोलिस विभागामार्फत संयुक्त नियोजन केले जाते. परंतु यंदा बैठकींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. गेल्या आठवडाभरापासून पालिकेत वारी नियोजनासंदर्भात दररोज बैठक होत आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दहा दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत वारीच्या पार्श्वभूमीवर सर्व कामे वेळेत पूर्ण करून वारकर्यांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी अधिकार्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दोन ते तीन दिवसांच्या अंतराने नियोजनाचा आढावा घेणार्या बैठका सुरू आहेत.
चार दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकार्यांची बैठक पार पडली. त्यात शौचालयांची संख्या, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि रस्त्यांची डागडुजी या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मंगळवारी विश्रांतवाडी येथे जाऊन प्रत्यक्ष पालखी मार्गांची पाहणी केली. तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही स्वतंत्र बैठक घेऊन अधिकार्यांकडून नियोजनाचा आढावा घेतला.
तसेच, कसबा विधानसभा क्षेत्रातील आमदार हेमंत रासने यांनीसुद्धा अधिकार्यांसोबत बैठक घेऊन सूचना दिल्या. या सार्या स्वतंत्र बैठका वेगवेगळ्या नेत्यांकडून वेळोवेळी घेतल्या जात असल्यामुळे महापालिकेचे अधिकारी सतत कार्यालयाबाहेर असल्याने नागरिकांच्या सेवांमध्ये अडथळा निर्माण होत आहे.
पालखी आगमनाच्या दोन दिवस आधी बुधवारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि महापालिकेचे विविध विभागप्रमुख सहभागी झाले होते. बैठक सुमारे अडीच ते तीन तास चालल्यामुळे अनेक अधिकारी कार्यालयात अनुपस्थित होते आणि त्याचा फटका नागरिकांना बसला.
दोन्ही पालख्या शुक्रवारी पुण्यात दाखल होत आहेत. काही अडचणी उद्भवल्यास महापालिका आणि पोलिसांचे नियोजन कसे असेल, यावर चर्चा करण्यासाठी बैठक झाली. वारीसंदर्भात महापालिकेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका