

पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजे असतानाच कात्रजमधील आंबेगाव परिसरात एका महिलेने सहा वर्षांच्या मुलासह इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 18) सायंकाळी घडली. महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नणंदेच्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
आत्महत्या प्रकरणाची नोंद आंबेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला एका खासगी शाळेत बालवाडीत शिक्षिका होत्या. त्यांचे पती हे एका बँकेत नोकरी करत आहेत. (Latest Pune News)
हे कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून कात्रजमधील आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सृष्टी सोसायटीत ते राहायला आहे. त्यांना एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास महिलेने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन सहा वर्षांच्या मुलासह उडी मारली. त्या वेळी पती घरात नव्हते.
आवाज झाल्यानंतर सोसायटीतील नागरिक बाहेर आले. तेव्हा महिला आणि मुलगा हे सोसायटीतील आवारात रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. या घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोालिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली. नणंदेच्या त्रासामुळे आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे.