

पुणे: पुण्यातील एका लोखंड व्यावसायिकाच्या गोडाऊनवर ५० कोटींच्या खंडणीसाठी गोळीबार करून, फरार झालेल्या लॉरेन्स बिष्णोई टोळीचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही. सोमवारी (दि.२२) रात्री साडेनऊच्या सुमारास मंतरवाडी-कात्रज बायपास रोड, उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली होती. या घटनेला चार दिवसांचा कालावधी लोटला असून, अद्याप गोळीबार करणारे फरार आहेत.
दरम्यान, या घटनेला एक दिवसाचा कालावधी लोटतो आहे ना, तोपर्यंतच बुधवारी (दि. २४) वडकी परिसरातील एका मेडिकल डिस्ट्रीब्युटरला याच टोळीने खंडणीसाठी कॉल केला. खंडणीची केलेली मागणी आणि पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करत असताना झालेला गोळीबार यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खंडणी गोळीबारप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात आरजू बिष्णोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात गोळीबार करणाऱ्या आरोपींची ओळख पटली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीदेखील मिळून आली आहे. ओळख पटलेला आरोपी हा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधीत असून, तो यापूर्वी या परिसरातील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होता. त्यानेच या व्यावसायिकाच्या गोडाऊनची रेकी करून ही माहिती बिष्णोई टोळीला पुरविल्याचा संशय आहे.
घटनेच्या दिवशी आरोपी आणि त्याचे साथीदार मोटरसायकलवरून गोडाऊन बाहेर आले होते. गोळीबार केल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबार आणि तेथून पळून जाण्याचा आरोपींचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आरोपींनी गोळीबार केल्यानंतर पळ काढल्यानंतर दुचाकी काही अंतरावर सोडून खासगी वाहनाने ते फरार झाल्याची माहिती आहे. व्यावसायिक आणि त्यांच्या मामाच्या मुलाच्या फोनवर इंटरनेट कॉलिंग करून बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई याने ५० कोटींच्या खंडणीची मागणी केली. सुरुवातीला फिर्यादींना तसेच त्यांच्या मामाच्या मुलाला कोणी तरी आपली मस्करी करत असल्याचे वाटले. परंतु, काही वेळानंतर सतत त्याच क्रमांकावरून कॉल येऊ लागल्याने त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
...अन् गोडाऊनवर गोळीबार झाल्याचे नोकराने कळवले
सतत एकाच क्रमांकावरून कॉल येत असल्याची माहिती व्यावसायिक व त्यांच्या मामाचा मुलगा पोलिसांना देत होते. तेवढ्यात सव्वाआठच्या सुमारास त्यांच्या नोकराने फोन करून सांगितले की, गोडाऊनवर गोळीबार झाला आहे. व्यावसायिकाला फोन करून परत त्याने धमकाविले. यानंतर आरजू याने संबंधित पोस्टमध्ये व्यावसायिकांची नावे घेत त्यांच्या गोडाऊनवर गोळीबार करण्यात आला. आरजू बिष्णोई, शुभम लोणकर आणि टायसन बिष्णोई यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारल्याचा उल्लेख पोस्टमध्ये केला आहे.