Crime news : जुगाराच्या नादासाठी चोरले अकरा लाखांचे लॅपटॉप

Crime news : जुगाराच्या नादासाठी चोरले अकरा लाखांचे लॅपटॉप

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील विविध महाविद्यालयांच्या वसतिगृहात शिरून लॅपटॉप चोरणार्‍या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लॅपटॉप चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आले असून, 28 लॅपटॉप, एक टॅब, मोबाईल संच असा दहा लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नीलेश प्रफुलचंद्र कर्नावट (वय 39, रा. नांद्रा, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. नगर रस्त्यावरील वाघोली भागातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचे लॅपटॉप चोरीला गेला होते.

या गुन्ह्याचा तपास लोणीकंद पोलिसांकडून करण्यात येत होता. लॅपटॉप चोरट्याचा माग काढण्यात येत होता. कर्नावट वाघोलीतील रायसोनी महाविद्यालयाजवळ थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी अजित फरांदे यांना मिळाली. सापळा लावून त्याला पकडले. तपासात त्याने शहरातील विविध महाविद्यालयांच्या वसतिगृहातून लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 28 लॅपटॉप, एक टॅब जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, पोलिस निरीक्षक मारुती पाटील, सहायक निरीक्षक गजानन जाधव, रवींद्र गोडसे, बाळासाहेब सकाटे, संदीप तिकोणे, अजिय फरांदे, सागर जगताप, विनायक साळवे आदींनी ही कारवाई केली. आरोपी कर्नावटने रायसोनी कॉलेज, सिंहगड कॉलेज, सिम्बायोसिस कॉलेज, एमआयटी कॉलेज तसेच वारजे, देहू, बिबवेवाडी, लोणावळा परिसरातून लॅपटॉप चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक काइंगडे यांनी दिली.

लॅपटॉप विक्री करून खेळायचा जुगार
कर्नावट हा फिरस्ता आहे. त्याला जुगाराचे व्यसन आहे. चोरीचे लॅपटॉप दोन तीन हजार रुपयांत विक्री करत होता. शनिवारी आणि रविवारी प्रामुख्याने तो ह्या चोर्‍या करत होता. दिवसभर हॉस्टेल परिसरातील रेकी करून ज्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तेथे तो शिरत होता. त्यानंतर लॅपटॉप चोरी करत असे. पुढे ते लॅपटॉप रस्त्यावरील व्यक्तींना विक्री करत होता. मात्र, त्याची चाल पोलिसांच्या लक्षात आली अन् तो जाळ्यात अडकला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news