

सासवड : प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प करण्याची प्रशासनाने जोरदार तयारी केलेली आहे. त्याबाबत प्रकल्पबाधित तीन गावांमध्ये मोजणी करण्यास शुक्रवारी (दि. 26) सुरुवात करण्यात आली आहे. (Latest Pune News)
बाधित गावातील जमीन मोजणीला परवानगी दिलेल्या शेतकऱ्यांच्या शेताची आणि पिकांची, झाडांची, विहीर पाईपलाईन, गोठा, घर अशी मोजणी केली जात आहे. 95 टक्के शेतकऱ्यांनी विमानतळाला जमीन देण्यास संमती दिली असल्याचा दावा शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र, शासनाने मोजणी केली तरी विमानतळाला जमीन द्यायची का नाही, हे शासनाने मोबदला जाहीर केल्यावर ठरवू, असे येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
या वेळी अप्पर जिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे, उपजिल्हाधिकारी अधिकारी संगिता राजापूरकर, उपजिल्हाधिकारी तथा प्रादेशिक अधिकारी बारामती, म.औ.विम हनुमंत पाटील, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, व्यवस्थापक मोनार्च, पुणे भरतेश शहा, तहसीलदार रूपाली सरनोबत, जिल्हाअधीक्षक भूमी अभिलेख प्रभाकर मुसळे, पुरंदर उपअधीक्षक भूमी अभिलेख स्मिता गौंड, उपायुक्त पशुधन विकास अधिकारी अंकुश परिहार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारी, वरिष्ठ अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, उपवनसंरक्षक, पुणे विभाग महादेव मोहिते, कार्यकारी अभियंता अर्जुन नाडगौडा, तहसीलदार पुरंदर विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गौर, तालुका कृषी अधिकारी पुरंदर श्रीधर चव्हाण आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुक्यात विमानतळ उभारण्यासाठी दि. 10 मार्चला राज्य सरकारने अधिसूचना जारी केली. त्या वेळी सुमारे साडेसात हजार एकर जमीन संपादित करण्याचे जाहीर केले होते. त्याला बाधित शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध झाला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांशी चर्चा केल्यानंतरही विरोध कायम होता. त्यानंतर सरकारने पॅकेज जाहीर केले.
संमतीने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना एरोसिटीत एकूण जमिनीच्या 10 टक्के जमीन, चौपट रक्कम, झाडे, बागा, विहिरी, घरे, यांच्या किंमतीनुसार त्याही काही प्रमाणात मोबदला देण्याचे निश्चित करण्यात आले.
कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, वनपुरी, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या सात गावांत विमानतळ होणार आहे. पहिल्या टप्प्यात एखतपूर, मुंजवडी आणि उदाचीवाडी या तीन गावांमध्ये मोजणी सुरू केली आहे. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग््राहणासाठी शासनाने आता आणखी एक पाऊल टाकले. विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांनी जमीन द्यायला परवानगी दिली, अशा शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये मोजणी सुरू करण्यात आली आहे. मुंजवडी, एखतपूर आणि उदाचीवाडी गावांमधून या मोजणीला सुरुवात झाली आहे.
एखतपूर येथे गावांमध्ये मोजणी सुरू करण्यात आली. याप्रसंगी प्रांत वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपुत व इतर.
प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोजणीला शुक्रवारी सुरुवात झाली आहे. जमिनीच्या मोजणीसाठी 5 पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, यासाठी पुढील 25 दिवसांची गरज लागणार आहे. पुढील काळात मोजणीसाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे
जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी