

पुणे: परदेशातील नातेवाइकांना दिवाळी फराळाचा आनंद घेता यावा, यासाठी यंदा टपाल विभाग सज्ज झाला आहे. फराळ पोहचविण्याची यंत्रणा सुरू झाली आहे, अशी माहिती पोस्ट विभागाचे संचालक नरेंद्र राऊत यांनी दिली.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात आहेत, तर काही जण नोकरी आणि व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत. परदेशात असलेल्या नातेवाइकांना दिवाळीचे औचित्य साधून फराळ पाठविण्याचे काम शहरातील पोस्ट कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. (Latest Pune News)
त्यानुसार तयारी पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात फराळ पाठविण्यास सुरुवात झाली आहे. टपाल कार्यालयाच्या वतीने ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इंग्लंड, चीन, यू. ए. ई., रशिया या शिवाय जगातील सर्वच देशात दिवाळीचा फराळ टपाल विभागाच्या वतीने पाठविण्यात येतो. याबाबत माहिती देताना राऊत म्हणाले, परदेशात पोहचविण्यासाठी टपाल विभाग याही वर्षी सज्ज आहे.
दिवाळीनिमित्त पुणे टपाल विभागाने अभिनव उपक्रम राबविला असून, फराळाचे पदार्थ दिल्यानंतर ते नाममात्र किमतीत पॅकिंग करून माफक दरात परदेशात पाठविण्याची सोय केली आहे. मागील वर्षीही या उपक्रमांतर्गत पुणेकरांनी पोस्ट ऑफिसमार्फत सुमारे 1,8000 किलो फराळ आपल्या परदेशातील प्रियजनांना पाठवला आहे.
पुणे शहरातील पुणे एच.ओ, पुणे सिटी पोस्ट ऑफिस, चिंचवड ईस्ट, मार्केटयार्ड ,पर्वती आणि इतर निवडक पोस्ट ऑफिसेसमध्ये तसेच सोलापूर, अहिल्यानगर आणि सातारा जिल्ह्यामधील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये फराळाच्या पदार्थांच्या बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांमध्ये दिवाळीचा फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग करून हा बॉक्स लगेचच परदेशात पाठविला जाणार आहे.
पार्सल सेवेबरोबरच फ्री पिक सेवा
दिवाळीचा फराळ करून तयार आहे; पण तो पाठविण्याचा मुहूर्त लागत नाही तसेच आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून टपाल कार्यालयामध्ये येऊ शकत नाहीत अशा नागरिकांसाठी घरी येऊन दिवाळी फराळाचे पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाच्या पदार्थांचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील. अमेरिका वगळता अन्य देशांत दिवाळी फराळ पाठविण्यासाठी पोस्ट विभागाकडून फ्री पिक सेवा लोकांसाठी खूप उपयोगी ठरणार आहे, त्यामुळे नागरिकांनी टपाल विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पुणे टपाल विभागाचे निदेशक बनसोडे यांनी सांगितले.
अमेरिकेतील पार्सल सेवा यंदा बंद
दिवाळीनिमित्त शहर-जिल्ह्यातून अमेरिकेला सर्वांत अधिक दिवाळी फराळ पाठविण्यात येतो. जगातील इतर देशांपेक्षा पुण्यातील अनेक नागरिक, विद्यार्थी अमेरिकेत स्थायिक आहेत. मात्र, यंदा भारत सरकारने अमेरिकेत पाठविण्यात येणारी सर्व पार्सल सेवा बंद केली आहे. त्याचा खूप मोठा आर्थिक फटका शहारातील टपाल कार्यालयांना बसला आहे.