Lalit Patil Drug Case : ललित पाटीलसह चौदा जणांवर दोषारोपपत्र

Lalit Patil Drug Case : ललित पाटीलसह चौदा जणांवर दोषारोपपत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात कारागृहात असताना आजारपणाचे नाटक करून ससून रुग्णालयात राहून ड्रग्ज तस्करीच्या व्यवसायात सक्रीय असणार्‍या कुख्यात ललित अनिल पाटील (वय 37) याच्यासह चौदा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तब्बल 3 हजार 150 पानांचे दोषारोपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झाले. दोषारोपपत्राच्या माध्यमातून पुणे पोलिसांनी महत्त्वपूर्ण ठोस पुरावे जप्त केले आहेत. ड्रग्ज प्रकरणात मोक्का लागून दाखल झालेले हे पहिले आरोपपत्र आहे. दोषारोपपत्रानुसार, ससूनमध्ये रॅकेट चालवत असताना पुणे पोलिसांनी कारवाई करत 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ललित पळून गेल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढली. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस, कारागृह पोलिस, कारागृहातील डॉक्टरसह, ससून रुग्णालयातील डॉक्टरचा या प्रकरणात संबंध आला होता. या प्रकरणात 4 पोलिस कर्मचार्‍यांना बडतर्फ करण्यात आले, सहा जणांना निलंबित करण्यात आले.

दरम्यान, ललित पाटीलला पळून गेल्यानंतर नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर गुन्ह्यातील तपासात नाशिक येथील बंद पडलेल्या कारखान्यात ड्रग्जचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. येथून तब्बल 300 कोटींचे 133 किलो मेफेड्रोन जप्त केले होते. संघटित टोळी तयार करून हे गैरकृत्य सुरू असल्याने मोक्कानुसार कारवाईचा बडगा उगारला गेला. याप्रकरणी पोलिसांकडून 100हून अधिक साक्षीदारांची यादी आरोपपत्रात जोडण्यात आली आहे. त्या आधारे तपास अधिकार्‍यांनी गुन्ह्याची साखळी योग्य पद्धतीने जोडली आहे. तत्कालीन पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, तत्कालीन अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे, सतीश गोवेकर यांच्या पथकांनी योग्य कामगिरी बजावली. यामध्ये विशेष सरकारी वकील विजय फरगडे काम पाहणार आहेत.

…म्हणून झाली मोक्काची कारवाई

आरोपींच्या पूर्वरेकॉर्डची पाहणी करता, दाखल गुन्ह्यातील आरोपी ललित पाटील व अरविंद कुमार लोहारे यांनी स्वतःच्या नेतृत्वात संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली. त्यामध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन मागील काही वर्षांत टोळीतील सदस्यांनी एकट्याने किंवा संघटितरीत्या अमली पदार्थाचा साठा करणे, विक्री करणे, वाहतूक करणे व निर्मिती करणे अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे.

सोनाराकडून आणखी पाच किलो सोने जप्त

पोलिसांच्या हाती ललितने लपविलेले आणखी मोठे घबाड लागले. पुणे पोलिसांनी नाशिक परिसरातून सोनाराच्या घरातून 5 किलो सोने जप्त केले आहे. यापूर्वीही पुणे पोलिसांनी 3 किलो सोने जप्त केले आहे. ते सोने ललितने एका सोनाराकडे प्लेटच्या स्वरूपात दिले होते. ललितचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांच्या चौकशीत त्यांनी तीन किलो सोने काढून दिले होते.

आरोपपत्र दाखल असलेले आरोपी

मास्टर माईंड ललित अनिल पाटील (वय 37, रा. नाशिक), अरविंद कुमार प्रकाशचंद्र लोहरे (रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश ), अमित जानकी सहा ऊर्फ सुभाष जानकी मंडल (वय 29, रा. पुणे ), रौफ रहीम शेख (वय 19, रा. ताडीवाला रोड), भूषण अनिल पाटील (वय 34, रा. नाशिक) , अभिषेक विलास बलकवडे (वय 36, रा. नाशिक), रेहान ऊर्फ गोलू आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (वय 26, रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), प्रज्ञा अरुण कांबळे ऊर्फ प्रज्ञा रोहित माहिरे (वय 39, रा. नाशिक), जिशान इक्बाल शेख (रा. नाशिक), शिवाजी अंबादास शिंदे (वय 40, रा. नाशिक), राहुल पंडित ऊर्फ रोहित कुमार चौधरी ऊर्फ अमित कुमार (वय 30 ,रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबूराव कांबळे (वय 32, रा. मंठा, जि. जालना), इमरान शेख ऊर्फ आमिर अतिक खान (वय 30, रा. धारावी), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय 29, रा. वसई, पालघर) यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news