पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात महादेव जानकर विरूद्ध स्वरूप जानकर अशी काका- पुतण्याची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भाने स्वरूप जानकर यांनी एक व्हीडीओ पोस्ट केला आहे. महादेव जानकर यांनी कुटुंबियांशी सुसंवाद साधला नाही तर लढत अटळ असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर हे सद्या महायुतीबरोबर आहेत. त्यांनी परभणी व माढा मतदारसंघात तयारी केली आहे. तसेच त्यांना महाविकास आघाडीतून माढा मतदारसंघ सोडण्याची आॅफर शरद पवार यांनी दिलेली आहे. यापार्श्वभुमीवर स्वरूप जानकर यांची भुमिका पुढे आली आहे. स्वरूप जानकर हे पेशाने पत्रकार असून त्यांनी २०१४ मध्ये माढा लोकसभेला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
चार दिवसांपुर्वी परभणी येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना महादेव जानकर यांनी माझा पुतण्या राजकारणात येणार नाही, असे म्हटले होते. त्यावर स्वरूप जानकर यांनी राजकारणात येणार असल्याची भुमिका स्पष्ट केली होती. यासंदर्भाने अधिक स्पष्टीकरण त्यांनी व्हीडीओमधून दिले आहे. स्वरूप जानकर यांनी म्हटले आहे की, गेल्या ३० वर्षांत त्यांनी कुटुंबियांशी कधीही सुसंवाद केला नसलातरी कुटुंबियांनी त्यांना शक्य ती साथ दिलेली आहे. २०१४ साली माढा मतदारसंघात त्यांच्याविरोधात दोन स्वयंघोषित धनगर नेत्यांनी कटकारस्थान केले तेव्हा मी राजकारणात उडी घेऊन लोकसभेला अर्ज भरला होता. शेवटच्याक्षणी मला अर्ज मागे घ्यावा लागला, मात्र माझ्या भुमिकेमुळे कारस्थानी नेते उघडे पडले.
त्यांच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतरच्या काळात जानकर साहेब सत्तेत आले. आमदार, मंत्री झाले. गेल्या दहा वर्षापासून ते मुख्य राजकीय प्रवाहात आहेत. यादरम्यान, मी पुतण्या म्हणून आजवर कधी त्यांचे नावही सांगितलेले नाही. त्यांच्या नावाचा गैरवापर करायची गोष्ट तर फार लांबची बाब आहे. त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात मी त्यांच्या घरी अथवा आफिसच्या आत पाऊलही टाकलेले नाही. मीही स्वाभिमानी आहे. असे असताना जानकर साहेब वारंवार पुतण्या राजाकरणात येणार नाही असे सांगतात, ही बाब खटकणारी आहे. २०१४ पुर्वी त्यांनी केलेल्या राजकीय संघर्षाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे.
पण सत्तेतल्या जानकर साहेबांची आम्हाला नेहमी चिंता वाटत असते. त्यामुळे अप्रत्यक्षपणे मदत करण्याची भुमिका आमची असते, पण त्यांना ती मदतही नको आहे, असे दिसत आहे. त्यामुळे पुतण्या राजकारण करणार नाही, या त्यांच्या भुमिकेला विरोध करावा लागत आहे. आता तुमच्यासह अथवा तुमच्याविना राजकीय वाटचाल करायची, हे पक्के ठरवले आहे. तुम्ही परभणीतून लढा किंवा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लढा आमची काही हरकत नाही. पण तुम्ही माढ्यातून लढायचा विचार करत असाल तर गंभीरपणे सुसंवाद करा. अन्यथा माढयात तुमचा पुतण्या तुमच्यासमोर असणार आहे, याची गंभीरपणे नोंद घ्या हे मला सांगायचे आहे.
हेही वाचा