पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये शैक्षणिक सत्र सुरू असल्याने त्यांच्या शैक्षणिक कामकाजात तसेच विद्यापीठातील प्रशासकीय कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही, ही आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांना विद्यापीठामार्फत विद्यापीठ व परिसरामध्ये शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याबाबतचे जाहीर प्रकटन विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
विद्यापीठामध्ये ललित कला केंद्र (गुरुकुल) विभागामधील घटनेनंतर पोलिस प्रशासनामार्फत कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. तसेच, विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाने संबंधित घटनेची गंभीर दखल घेतली असून, निवृत्त जिल्हा न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती तत्काळ नेमली आहे. यासंबंधात विद्यापीठाकडून आवश्यक सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. विद्यार्थी, नागरिक, संस्था, संघटना व समाजातील सर्व घटकांनी आपले विचार, मत, भावना व्यक्त करताना विद्यापीठातील शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज करताना कोणताही व्यत्यय, अडथळा येणार नाही आणि विद्यापीठाचे शैक्षणिक वातावरण चांगले राहील, याचा आपण सर्वतोपरी प्रयत्न करावा, असे आवाहनही विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.
ललित कला केंद्रात सादर झालेल्या नाटकावरून समाजात वाद निर्माण झाला. काही विद्यार्थी संघटना व राजकीय पक्षांनी यावर आक्षेत घेत आंदोलन केले. त्यानंतर विभा प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांच्यासह विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झाले तसेच विद्यापीठाच्या मालमत्तेची तोडफोड केली. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठातर्फे प्रकटनाद्वारे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा