तलाव, बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात; इंदापूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे

तलाव, बंधारे कोरडे पडण्यास सुरुवात; इंदापूर तालुक्यात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये अपुर्‍या प्रमाणावरती पाऊस झाल्याने, चालू वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच ठीक-ठिकाणी असलेले पाझर तलाव, तळी, सिमेंट बंधारे सध्या कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची टंचाई भासण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. इंदापूर तालुक्यातून वाहणार्‍या निरा नदीवरील सराटी बंधार्‍यासह अनेक ठिकाणचे बंधारे कोरडे पडले आहेत उर्वरित बंधार्‍यांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिलेला दिसत आहे.

त्यामुळे निरा नदीकाठच्या गावांमधील शेतातील उभी पिके कोमजून चालली असून, चालू उन्हाळ्यामध्ये माणसांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे निरा नदीकाठच्या अनेक गावांमध्ये आगामी उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करावे लागतील, अशी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. तसेच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्नही निर्माण होणार आहे, अशी माहिती इंदापूर बाजार समितीचे माजी संचालक महावीर गांधी, राहुल कांबळे, राजीव भाळे, वैभव पाटील (खोरोची) यांनी दिली.

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीमधील पाण्याची पातळी चालू वर्षी झपाट्याने खोलवर चालली आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगाम, शेतातील उभी पिके, फळबागा कशा जगवायच्या याची चिंता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे. सध्या तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील पिकांची काढणी, मळणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ही कामे चालू असल्याने शेतमजुरांच्या हाताला काम मिळत असलेने दुष्काळाचे दुष्परिणाम अजून तरी मोठ्या प्रमाणावरती जाणवत नाहीत.

मात्र ही कामे संपल्यानंतर शेतमजुरांच्या हाताला काम देण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे आतापासून शासनाने शेतमजुरांच्या हाताला मागणीनुसार काम देण्याचे नियोजन केले पाहिजे, अशी मागणी निरा भीमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे (सुरवड), दयानंद गायकवाड (बोराटवाडी), एच. के. चव्हाण (भोडणी) यांनी केली आहे.

बावडा येथील खंडोबानगर येथे असलेला पाझर तलाव गेल्या काही दिवसांपासून पाण्याअभावी कोरडा पडला आहे. त्यामुळे हा तलाव निरा डावा कालव्याच्या 59 फाट्यामधून किंवा शेटफळ हवेली तलावाच्या कॅनॉलमधून पाण्याने भरून घेण्यात यावा, अशी मागणी गावचे माजी सरपंच किरण पाटील यांनी केलेली आहे. एकंदरीत, आगामी काळात उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यासाठी इंदापूर तालुका प्रशासनाला सजग राहून परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news