उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविणार : अजित पवार यांची माहिती | पुढारी

उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविणार : अजित पवार यांची माहिती

बारामती : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर, जनाई-शिरसाई या उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविल्या जाणार आहेत. त्यामुळे वीजबिलाची बचत होणार असून, शेतकर्‍यांना फक्त पाणीपट्टी भरावी लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी 7 कोटी रुपये मंजूर केले आहेत. जनाई-शिरसाई योजनेचा लाभ बारामतीसह दौंड तालुक्यातील काही भागांना होतो. या योजना चालवायच्या झाल्या, तर शेतकर्‍यांना वीजबिलाचा मोठा भार सहन करावा लागतो, त्यासाठी त्या सौरऊर्जेवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुण्यातील सांडपाणी शुद्ध करून पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी वापरले जाते. त्यासाठी बारामती तालुक्यात वाकी व अन्य भागांत तलाव करण्यात आले आहेत. बंद पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. योजनेत काही त्रुटी आहेत. परंतु, त्या दूर करून नियमित पाणी दिले जाईल, असेही पवार यांनी सांगितले. पुरंदर उपसा सिंचन योजनेची देखभाल सोमेश्वर कारखाना, जनाईची माळेगाव कारखाना तर शिरसाईची दौंड शुगर कारखान्याकडे सोपवली जाणार आहे. या योजना चांगल्या चालल्या, तर ऊसक्षेत्र वाढणार असून, गेटकेनवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

महिला रुग्णालयाशेजारी नर्सिंग महाविद्यालय

बारामतीत विद्या प्रतिष्ठानचे एक खासगी नर्सिंग महाविद्यालय सुरू आहे. परंतु, पॅरामेडिकल स्टाफची वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाकडून आणखी एक नर्सिंग महाविद्यालय बारामतीत सुरू केले जात आहे. महिला रुग्णालयाशेजारील जागेत ते उभे केले जाईल, असेही पवार यांनी सांगितले.

फलटण ते इंदापूर रस्ता रिंगरोड

बारामती शहरातील वाहनांची वर्दळ कमी व्हावी, यासाठी फलटण रस्त्यापासून ते इंदापूर रस्त्याला मिळेल असा रिंगरोड तयार केला आहे. गवार फाट्यापासून निघणारा हा रिंगरोड बारामती अ‍ॅग्रोजवळ इंदापूर रस्त्याला मिळेल. याशिवाय बारामतीचे आयुर्वेदिक कॉलेज ते मेडिकल कॉलेज रस्ता चौपदरी केला जाणार आहे. मोरगाव रस्ता ते निरा रस्ता पुढे फलटण रस्त्यापर्यंत 24 मीटर रस्त्याचे नियोजन आहे. रस्ते संपादनासाठी नागरिकांनी जागा दिली तर त्यांना चांगला मोबदला मिळेल. शिवाय उरलेल्या जागेचे दर वाढतील, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा

Back to top button