Kurkumbh Drugs Case : सरकारी यंत्रणाच ड्रगच्या विळख्यात !

Kurkumbh Drugs Case : सरकारी यंत्रणाच ड्रगच्या विळख्यात !

कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरेटरीज कारखान्यातील मेफेड्रॉन (एमडी) ड्रग प्रकरण उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कुरकुंभ येथील कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा विभाग, औद्योगिक विकास महामंडळ, अन्न व औषध प्रशासनाचे नियंत्रण असते. मात्र, ड्रगची निर्मिती होत असताना शासनाने नेमलेल्या वरील विभागांचे संबंधित अधिकारी नेमके काय करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व सरकारी यंत्रणाच ड्रगच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे.

अर्थकेम लॅबोरेटरीज कारखान्यावर मंगळवारी (दि. 20) पुणे पोलिसांनी छापा टाकून साडेपाचशे किलो मेफेड्रॉन (एमडी) ड्रग जप्त केले. औद्योगिक क्षेत्रातील विविध विभागांच्या कामाची जबाबदारी असते. प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि कारखाना निरीक्षक यांची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात समर्थ लॅबोरेटरीज, सुजलाम केमिकल, अर्थकेम केमिकल्स या तीन कंपन्यांतील ड्रगच्या प्रकारामुळे प्रदूषण व सुरक्षा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रदूषण रोखण्यात अपयशी, कारखान्यात कायम अपघाताची मालिका सुरू आहे.

क्षमतेपेक्षा अधिक रसायनिक साठा, असुरक्षित वातावरण, शासनाचे नियम, अटी व शर्यती मोडणार्‍यांवर कारवाई नाही. त्याचबरोबर अर्थकेम कारखाना बंद असूनही उत्पादन प्रक्रिया सुरू होती. तिथे चक्क ड्रग तयार केले जात होते. अशा विविध गंभीर घटना घडूनही संबंधित विभागाच्या सुस्त झालेल्या अधिकार्‍यांना कसलीच फिकीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागातील वरिष्ठ व कनिष्ठ अधिकार्‍यांच्या बेपर्वा वृत्तीमुळे कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत बेकायदेशीर उद्योग करणार्‍यांना मोकळे रान सापडत आहे. दोषी कारखान्यांवर आत्तापर्यंत कोणती कारवाई या विभागांनी केली, हे गुलदस्तात आहे.

प्रदूषण मंडळाचे अधिकारी अर्थपूर्णरीतीने या भागात शक्यतो फिरकत नसल्याने कारखान्यात बेकायदेशीर उद्योग जोमाने सुरू आहेत, हे अर्थकेम कंपनीत नुकत्याच सापडलेल्या 1100 कोटीच्या ड्रग प्रकरणावरून उघड झाले आहे. परवाना असो वा नसो, कोणतेही उत्पादन बिनधास्त घ्या तसेच बिनधास्त प्रदूषण करा, अशी स्थिती झाली आहे. कोणत्या विभागाचे कोणते काम, याचा प्रचंड गोंधळ आहे. तक्रार करायची तर कोणाकडे करायची? असा प्रश्न निर्माण होतो. अपघात घडला, कामगार मृत्युमुखी पडला तरी देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी भेट देतील, हे निश्चित नसते.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कशाचेही गांभीर्य राहिलेले नाही. अधिकार्‍यांनी सातत्याने कारखान्यांची पाहणी केली पाहिजे, तसे होत नाही. त्यामुळे वरील तिन्ही विभागांचे अधिकारी कायमस्वरूपी कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात असणे गरजेचे असून, त्यांची व्यवस्था कुरकुंभ एमआयडीसी कार्यालयात होऊ शकते.

– राहुल भोसले, माजी सरपंच, कुरकुंभ

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news