खेड तालुक्यातील प्रकार : गावांची रक्कम चक्क व्यक्तिगत खात्यावर! | पुढारी

खेड तालुक्यातील प्रकार : गावांची रक्कम चक्क व्यक्तिगत खात्यावर!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पैशांच्या अपहारासाठी औद्योगिक पट्ट्यातील ग्रामपंचायतींचे बँक खातेच दुसर्‍याच्या नावावर करण्याचे प्रकार घडले आहेत. खेड तालुक्यात ग्रामसेवकाच्या नावावर बँक खाते असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. ग्रामपंचायतींना मिळणारा निधी हा परस्पर लाटण्यासाठी हा प्रकार होत असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने औद्योगिक पट्ट्यातील ग्रामपंचायतींची दप्तर तपासणीच करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत. या औद्योगिक पट्ट्यालगत असलेल्या ग्रामपंचायतींना यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. या उत्पन्नाचा उपयोग करून काही ग्रामपंचायतींनी गावाचा खर्‍या अर्थाने विकास केल्याचे दिसते. परंतु, या आणि इतर मार्गाने ग्रामपंचायतींना मिळणारा निधी लाटण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतींचे बँक खातेच स्वतःच्या नावावर करून घेण्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार गंभीर असून, ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक अनियमिततेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता जिल्हा परिषद प्रशासनाने व्यक्त केली आहे.

खेड तालुक्यातील ग्रामपंचायतीचे बँक खाते ग्रामसेवकाच्या नावावर असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा परिषदेने या प्रकाराची गंभीर दखल घेतली. पंचायत समितीला या प्रकरणाची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील जेवढ्याही ग्रामपंचायती औद्योगिक क्षेत्रालगत आहेत, त्या सर्व ग्रामपंचायतींची सखोल दप्तर तपासणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी अधिकार्‍यांना दिले आहेत.

अशा आणखी किती ग्रामपंचायती…?

खेड तालुक्यातील ग्रामपंचायतींबद्दल तक्रार आल्याने बँक खाते दुसर्‍याच्या नावे असल्याचे प्रशासनाला समजले. परंतु, आत्तापर्यंत प्रशासनाच्या ही बाब लक्षात का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच आता प्रामाणिकपणे दप्तर तपासणी केली तर आणखी ग्रामपंचायतींमधील देखील असे प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button