नाशिक : चोरट्यांचा मंदिरातील दानपेटीवर दुसऱ्यांदा डल्ला
नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या स्वामी समर्थ व ग्रामदैवत दुर्गा माता मंदिरात रविवारी (दि.२५) रोजी पुन्हा चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच गुरुवारी (दि.८) रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी स्वामी समर्थांची मूर्ती व दान पेटी फोडून त्यातील जवळपास पन्नास ते साठ हजार इतक्या रकमेचा पोबारा केला होता. याची ताजी घटना असताना व त्या चोरीची पोलिसांना उकल होत नाही तोच रविवारी (दि.२५) रोजी पुन्हा याच ठिकाणी चोरट्यांनी ग्रामदैवत असलेल्या दुर्गा माता मंदिरात गेटचे कुलूप तोडून दान पेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र स्वामी समर्थ मंदिरातील दान पेटी फोडून चोरट्यांनी हेतू साध्य करत रोख रक्कम पोबारा केली आहे. अवघ्या पंधरवड्यातच दुसऱ्यांदा चोरी होत असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी देवळा पोलिसांसमोर आव्हान ठाकले आहे.
दुर्गा माता मंदिरातील दान पेटी चोरट्यांना फोडता आली नाही. मूर्ती जवळील सामान अस्ताव्यस्त करण्यात आले आहे. तसेच मंदिराच्या पुजारीच्या खोलीतील कपाट तोडले आहे. मात्र एक सोन्याचा हार चोरीस गेल्याचे समजते. सोमवारी (दि. २६) रोजी सकाळी स्वामी समर्थ मंदिराचे सेवेकरी किशोर आहेर हे मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्यावर त्यांच्या घडलेला प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने पोलिसांना कळविले. याठिकाणी सतत घडत असलेल्या चोऱ्या थांबता थांबत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. चोरांचा मागोवा शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक पाचारण केले आहे.
देवळा शहरात वारंवार दुचाकी तसेच इतर छोट्या मोठ्या चोऱ्या होत असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र पोलीस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मंदिरात घडलेल्या प्रकाराने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे .

