

पुणे: भटक्या आणि मोकाट श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महापालिकेकडून नसबंदी आणि लसीकरणाच्या मोहिमा राबवल्या जात असल्या, तरी उपलब्ध आकडेवारीत नसबंदीच्या तुलनेत लसीकरणाला अधिक वेग दिला जात आहे. मात्र, पुणेकरांच्या श्वान दंशाच्या दरात, रस्त्यांवर मोकाट श्वानांच्या दहशतीचा प्रश्न कायम असल्याचे स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या उपलब्ध वर्षनिहाय अहवालानुसार, २०२०-२१ मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ९९२ श्वानांची नसबंदी करण्यात आली. २०२१-२२ मध्ये ही संख्या १३ हजार १४८, तर २०२२-२३ मध्ये ३१ हजार १३३ झाली. २०२३-२४ मध्ये नसबंदीचा आकडा ५६ हजार ८२२ वर पोहोचला.
सहा महिन्यांत ३४ हजार ६०३ श्वानांची नसबंदी
मात्र, २०२४-२५ मध्ये नसबंदीची संख्या ६१ हजार ४५३ असतानाच विशेष मोहिमेत तब्बल १ लाख ६५ हजार ९२४ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे त्या वर्षातील नसबंदी व लसीकरणाची एकत्रित संख्या २ लाख २७ हजार ३७७ वर पोहोचली. चालू २०२५-२६ या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या अवघ्या सहा महिन्यांत ३४ हजार ६०३ श्वानांची नसबंदी आणि १ लाख ५९ हजार २७६ श्वानांचे लसीकरण करण्यात आले. एकूण संख्या १ लाख ९३ हजार ८७९ झाली आहे. म्हणजेच मागील संपूर्ण वर्षाच्या तुलनेत सहा महिन्यांतच ८५ टक्क्यांहून अधिक काम झाले आहे.
ठोस उपाययोजनांवर लक्ष द्यावे!
लसीकरणामुळे श्वानांचा उपद्रव कमी होत नाही; त्यासाठी प्रभावी नसबंदी हाच मूलभूत उपाय आहे. शहराच्या विविध भागांत टोळक्याने फिरणारे श्वान, रात्रीच्या वेळी होणारा त्रास, दुचाकीस्वारांच्या मागे लागणे तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे केवळ लसीकरणाचे मोठे आकडे दाखवून प्रशासनाची कामगिरी मोजणे पुरेसे ठरणार नसून ठोस उपाययोजनांवर महापालिकेने लक्ष द्यावे, असे मत एका ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य श्रीकांत कामठेपुरे यांनी सांगितले.
गेल्या सहा वर्षांतील आकडेवारी
वर्ष - नसबंदी - लसीकरण - एकूण
२०२०-२१ - ९९२ - ० - ९९२
२०२१-२२ - १३,१४८ - ६,१५५ - १९,३०३
२०२२-२३ - ३१,१३३ - ६,९०७ - ३८,०४०
२०२३-२४ - ५६,८२२ - ६,२०८ - ६३,०३०
२०२४-२५ - ६१,४५३ - १,६५,९२४ - २,२७,३७७
२०२५-२६ - ३४,६०३ - १,५९,२७६ - १,९३,८७९