

भामा आसखेड: अपघाती घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या वारसांना राज्य सरकारचे प्रत्येकी पाच लाख आणि केंद्र सरकारकडून दोन लाख मिळणार असून, जखमी व्यक्तींचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. तशा सूचना जखमींवर उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलला शासनाच्या प्रशासनाकडून मंगळवारी (दि.12) करण्यात आल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले दिगंबर रौधळ हे मूळ पाईटगावचे रहिवासी आहेत. अपघाताची दुर्दैवी घडताच ते येथे आल्यानंतर त्यांनी घडलेला अपघात आणि जखमींची स्थिती, याची सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री पवार यांना दिली. पवार यांनी तातडीने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा विषय घेऊन सर्व मृत महिलांच्या वारसदारांना चार लाखांऐवजी पाच लाख मदत देण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनेदेखील घोषणा करून दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतल्याने मृतांच्या वारसांना प्रत्येकी सात लाख रुपये मिळणार आहेत. (Latest Pune News)
जखमी व्यक्तींचीदेखील परिस्थिती अतिशय गंभीर असून, मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याचे सांगितल्यावर पवार यांनी जिल्हाधिकार्यांना मोफत उपचार करण्याचे पत्र काढायला लावले. जिल्हाधिकारी यांनी काढलेले पत्र तालुक्याचे उपविभागीय अधिकार्यांनी प्रत्यक्ष हॉस्पिटलला भेटून मोफत चांगले उपचार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
विशेष बाब म्हणजे, उपमुख्यमंत्री पवार यांचे मेडिकल सेलचे प्रमुख अधिकारी मधुसूदन मगर हेदेखील खेड तालुक्यात दाखल असून, प्रत्येक हॉस्पिटलला भेट देऊन डॉक्टरांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना करीत आहेत. राज्याच्या वरिष्ठपातळीवरून उपचाराच्या कडक सूचना देण्यात आल्या असून, हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टरदेखील जखमी व्यक्तींना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे समजले आहे.
जखमी व्यक्तींमध्ये महिला असून, काही लहान मुले आहेत. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने उपचार करणार्या अनेक भाविक महिलांची स्थिती गंभीर आहे. राज्य सरकारने जखमींवर मोफत उपचार करण्याच्या कडक सूचना केल्याने नातेवाइकांना आधार मिळाला आहे. मोठ्या शस्त्रक्रियेचा खर्च पेलवणे महिलांच्या घरच्यांना अवघड होते. कारण, सर्व महिला शेतकरी कुटुंबातील असून, त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.
दिगंबर रौधळ यांनी सतत उपमुख्यमंत्री पवार यांच्या संपर्कात राहून सर्व माहिती सांगितल्याने पवार यांनी मोफत उपचाराचा चांगला निर्णय घेतला आहे. खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनीदेखील उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींसह नातेवाईक यांची भेट घेऊन हॉस्पिटल प्रशासनाला मोफत उपचाराचे पत्र दिले. जखमी व्यक्तींवर पुणे, भोसरी, चाकण, राजगुरुनगर येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.