राजगुरुनगर: मागील एक ते दोन वर्षांमध्ये खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील नावारूपास आलेली कुंडेश्वर व वांद्रे पर्यटन केंद्र सध्या काही राजकीय लोकांसाठी प्रचार केंद्र बनली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोन्ही पर्यटन केंद्रांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी झाल्याने कुंडेश्वर येथे श्रावणी सोमवारनिमित्त व वांद्रे येथे विकेंडला भाविक व पर्यटकांची प्रचंड गर्दी होते.
याशिवाय जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार देखील गाड्यांच्या गाड्या भरून स्थानिक लोकांना या ठिकाणी मोफत ट्रिपसाठी घेऊन जातात. मात्र, येथे पायाभूत सुविधा व सुरक्षिततेच्या नावाने बोंब असून, रस्त्यांच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. (Latest Pune News)
कुंडेश्वर व वांद्रे ही दोन्ही ठिकाणे राजगुरुनगर शहरापासून 20 ते 40 किलोमीटर अंतरावर असून, पर्यटन केंद्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. या भागात पायभूत व आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला असून, सुरक्षिततेच्या कोणत्याही
उपाययोजना नाहीत. यामुळेच भविष्यात आणखी मोठी दुर्घटना टाळण्यासाठी वेळेतच दोन्ही पर्यटन केंद्रावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.राजगुरुनगर शहरापासून 20 ते 25 किलोमीटर अंतरावर पाईट गावालगत उंच डोंगरावर कुंडेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. राज्य शासनाने कुंडेश्वर देवस्थानला मकफ तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला असून, काही निधीदेखील दिला आहे.
या माध्यमातून येथे सभामंडप व अन्य काही विकासकामे करण्यात आली आहेत, तर राजगुरुनगर शहरापासून तब्बल 40 किलोमीटर अंतरावर वांद्रे गाव असून, गावच्या पढारवाडी येथील शासकीय पाझर तलावावर भुशी डॅमसारख्या पायर्या व सुरक्षित कठडे करण्यात आले आहेत. हे तालुक्याचे शेवटचे टोक आहे, असेच म्हणावे लागेल.
या दोन्ही ठिकाणांना स्थानिक नागरिक, पर्यटक व काही लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली. यामुळे सध्या या दोन्ही पर्यटन केंद्रांवर पर्यटक व भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.
परंतु, सोमवारी कुंडेश्वर येथील पिकअप दुर्घटनेसारखी घटना घडल्यास पायाभूत व आरोग्याच्या सुविधा नसल्याने लोकांना जीव गमावण्याची वेळ येते, हे नक्की.केवळ कुंडेश्वरच नव्हे, तर वांद्रे येथेदेखील प्रशासनाने तातडीने सुसज्ज पार्किंगव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
कुंडेश्वर तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र
पाईट येथील कुंडेश्वर डोंगरावर जाणारा घाट रस्ता अतिशय अरुंद, कच्चा आणि धोकादायक वळणांचा आहे. रस्त्यावर जागोजागी तीव्र चढ-उतार असून, रस्त्याला संरक्षक कठडे किंवा भिंती नाहीत. एकाच वेळी जाणारी व येणारी दोन वाहने समोरासमोर आल्यास चालकांना मोठी कसरत करावी लागते.
यासोबतच रस्त्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेकदा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तक्रारी केल्या होत्या. परंतु, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. कुंडेश्वर येथील रस्त्याची दुरुस्ती, संरक्षक कठडे, सुसज्ज पार्किंगव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
वांद्रे येथील बंधाऱ्यावर अश्लील चाळे
वांद्रे येथील शासकीय बंधाऱ्यावर भुशी डॅमसारख्या पायऱ्या व सुरक्षा कठडे बांधण्यात आले आहेत. पावसाळा सुरू झाल्यानंतर पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करीत आहेत. विकेंडला येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते. येथे मोठ्या प्रमाणात महिला, तरुणीदेखील पावसात भिजण्यासाठी येतात.
परंतु, अनेक पर्यटक दारूच्या नशेत येथे अश्लील चाळे करतात. गर्दीमुळे भांडणे व बाचाबाचीचे प्रसंग उद्भवतात. पर्यटक अतिप्रचंड प्रमाणात प्लास्टिक कचरा करतात. परंतु, येथे कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत, रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता राजगुरुनगर शहरापर्यंत पोहचण्यासाठी किमान अडीच-तीन तास लागतील, अशी स्थिती आहे.