निमोणे: शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यांसाठी वरदान ठरलेल्या घोड धरणाला वाळूमाफियांचे ग्रहण लागले होते. शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत 6 यांत्रिक बोटी व 8 फायबर बोटी स्फोटकाने उडवून दिल्याने वाळूमाफियांचा शिरूर हद्दीतील सुपडासाफ झाला आहे. या संयुक्त कारवाईत अंदाजे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात कारवाई पथकाला यश आले.
घोडमधील वाळूचोरीबाबत दै. ‘पुढारी’मध्ये दि. 27 जुलै रोजी ‘रात्रीस खेळ चाले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दि. 30 जुलै रोजी महसूल व पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत 4 यांत्रिक बोटी स्फोटकाने उडवून दिल्या होत्या. या कारवाईदरम्यान काही वाळूमाफिया श्रीगोंदा हद्दीत पळून गेले होते. या वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे नियोजन शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के हे गुप्तपणे करीत होते.
मंगळवारी (दि. 12) शिरूरच्या निवासी नायब तहसीलदार स्नेहल गिरीगोसावी यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस विभागाचे संयुक्त पथक चिंचणी बाजूकडून घोड धरणात उतरले. स्वयंचलित बोटीच्या साह्याने वाळूमाफियांच्या बोटींना कारवाई पथकाने वेढा दिला.
निमोणेचे मंडलाधिकारी नंदकुमार खरात यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्रत्यक्ष पाण्यात उतरत पर्यावरणाची कोणतीही हानी न होऊ देता यांत्रिक बोटी व वाळू वाहतूक करणारे फायबर स्फोटकाने उडवून दिले. या धाडसी कारवाईमुळे वाळूमाफियांचा आर्थिक कणाच उद्ध्वस्त झाला असून, अंदाजे सव्वा कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल नष्ट झाला आहे.
या कारवाई पथकामध्ये निवासी नायब तहसीलदार स्नेहल गिरीगोसावी, मंडलाधिकारी नंदकुमार खरात, प्रशांत कांबळे, तलाठी राजू बडे, योगेश टिळेकर, आदित्य गायकवाड, अक्षय तांबट, हर्षद साबळे, रूपेश शेटे, श्रीकांत आढाव, आलिशा महाकाळ यांनी सहभाग घेतला.