तीन हजार वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या मुखवट्याचे गूढ

दक्षिण ग्रीसमध्ये मायसीने या पुरातत्त्वस्थळी केलेल्या उत्खननात सापडला होता हा मुखवटा
mystery of the golden mask of three thousand years ago
ग्रीसमध्ये मायसीने या पुरातत्त्वस्थळी केलेल्या उत्खननात मुखवटा सापडला. Pudhari File Photo
Published on
Updated on

अथेन्स : ग्रीसमध्ये सापडलेल्या तब्बल 3,500 वर्षांपूर्वीच्या सोन्याच्या मुखवट्याबाबत अनेक दशकांपासून पुरातत्त्व संशोधकांमध्ये कुतूहल व मतभेदही आहेत. हा मुखवटा प्राचीन ग्रीक साहित्यात वर्णन केलेल्या राजा अगामेमोन (अगेम्नोन) याचा मानला जातो. होमरचे ‘इलियड’ हे महाकाव्य जगप्रसिद्ध आहे. ट्रोजन युद्धाशी संबंधित असलेले हे महाकाव्य सत्य घटनेवर आधारित होते, असे काही संशोधकांना या मुखवट्यावरून वाटते. दक्षिण ग्रीसमध्ये मायसीने या पुरातत्त्वस्थळी केलेल्या उत्खननात हा मुखवटा सापडला होता. हा सोन्याचा मुखवटा इसवी सन पूर्व 1500 या काळातील आहे.

सन 1876 मध्ये जर्मन पुरातत्त्व संशोधक हेनरीक र्श्लीमॅन यांना दक्षिण ग्रीसमधील मायसीने येथील कांस्य युगातील मकबर्‍याच्या उत्खननावेळी हा मुखवटा सापडला होता. र्श्लीमॅन यांचे म्हणणे होते की, पौराणिक राजा अगामेमोन याच्या शवासोबत हा मुखवटा होता. कवी होमर याने लिहिलेल्या ‘इलियड’ या महाकाव्यात याच राजाने ग्रीक वेढ्याचे नेतृत्व केल्याचे वर्णन आहे. अगामेमोन याने मायसीनेवर राज्य केले होते. र्श्लीमॅन यांच्या संशोधनामुळे या मुखवट्याला ‘मास्क ऑफ अगामेमोन’ असे म्हटले जाते. मात्र, मुखवट्याचा काळ विचारात घेता हे समीकरण जुळत नाही. या मुखवट्याची कलात्मक शैली आणि पेलोपोनिस प्रायद्वीपावरील पुरातत्त्वीय स्थळाच्या संशोधनानंतर असे दिसून येते की, हा मुखवटा इसवी सन पूर्व 1500 या काळातील आहे. त्यामुळे अगामेमोनच्या शेकडो वर्षे आधीच हा मुखवटा बनलेला होता, असे दिसते. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तर हा मुखवटा त्यापेक्षाही अधिक प्राचीन असू शकतो. हा मुखवटा सोन्याच्या एका पातळ पत्र्यापासून बनवलेला आहे. एखाद्या व्यक्तीचे तो जिवंत असतानाच चेहर्‍याचे मोजमाप घेऊन मुखवटा बनवला असावा, असे दिसते. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर हा मुखवटा परिधान करून त्याला दफन केले असावे. त्यामुळे या मुखवट्याला ‘मृत्यूचा मुखवटा’ असेही म्हटले जाते. हा मुखवटा ज्या शाही मकबर्‍यात सापडला, तिथे आठ लोकांचे अवशेष होते. या सर्व लोकांकडे शस्त्रे होती; पण केवळ पाचजणांनाच सोन्याचे मुखवटे घातले होते. ते मृत व्यक्तींच्या शाही स्थितीचा संकेत आहे. कांस्य युगाच्या काळात मायसेनियन लोक होते जे इसवी सन पूर्व 1750 नंतर संपूर्ण दक्षिण ग्रीसमध्ये राहत होते. ते ग्रीक भाषेच्या प्रारंभिक स्वरूपातील भाषेत बोलत असत. त्यांची संस्कृती क्रेटच्या मिनोअन संस्कृतीने प्रभावित होती. र्श्लीमॅन यांचे म्हणणे होते की, मायसेनियन अवशेष ट्रोजन युद्धाचे ऐतिहासिक वास्तव दर्शवतात. काही पुरातत्त्व संशोधकांना वाटते की, मायसेनियन संस्कृती इसवी सन पूर्व 1200 मध्ये उत्तर कांस्य युगाच्या अखेरच्या काळात संपुष्टात आली. त्यानंतर शेकडो वर्षांनी ट्रोजन युद्ध झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news