

राशिवडे : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये 18 ते 29 वयोगटातील 1 लाख 9 हजार 470 युवा मतदारांची पाच वर्षांमध्ये वाढ झाली आहे. 20 ते 69 वयोगटामधील 179 तृतीयपंथी मतदार आहेत. कागल मतदारसंघात 37 हजार 919 युवा मतदारांची भर पडली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात 19 हजार 590 युवा मतदारांची भर पडली. हे दोन्ही मतदारसंघ राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील आहेत.
जिल्ह्यात मार्च 2019 च्या तुलनेत युवा मतदारांमध्ये चांगलीच वाढ झाली असून पाच वर्षांनी ही संख्या 7 लाख 2 हजार 085 वर पोहोचली आहे. त्यामुळेच युवा पिढीचे प्रश्न, समस्या प्रचारात घेऊन त्याचा राजकीय फायदा उठविण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे. सर्रास युवा मतदार फेसबुक, व्हॉटस्अॅप, ट्विटर आदी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. याच माध्यमातून उमेदवारांना हुकमी मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. प्रचारासाठी प्रमुख नेत्यांसह राजकीय पक्ष, उमेदवारांचे स्वतंत्र कक्ष असून त्याची जबाबदारीही संगणक ज्ञान असणारे युवकच सांभाळताना दिसत आहेत. त्यामुळे युवकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय संघर्षाने लक्षवेधी ठरणार्या कागल व कोल्हापूर दक्षिण या मतदारसंघांमध्ये 2019 च्या तुलनेत युवा मतदारांची लक्षवेधी वाढ झाली असून येथे युवकांच्या भूमिकेला फार महत्त्व आले आहे.
मतदारसंघनिहाय 18 ते 29 वयोगटातील मतदार (सध्याचे मतदार पुढीलप्रमाणे, कंसात मार्च 2019 चे मतदार)
राधानगरी - 71,907 (70,398), चंदगड - 69,321 (66,044), कागल 76,761 (38,842), कोल्हापूर दक्षिण 82,238 (62,648), करवीर 73,207 (64,337), कोल्हापूर उत्तर 54,010 (49,098), शाहूवाडी 67,262 (60,954), हातकणंगले 71,455 (62,105), शिरोळ 71,128 (62,522), इचलकरंजी 64,798 (55,667).