

Cause of death spotted deer Pune
पुणे: राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात नुकत्याच 16 चितळांच्या झालेल्या मृत्यूचे कारण आता स्पष्ट झाले आहे. ‘लाळ खुरकत’ (फूट अँड माऊथ डायसेस-एफएमडी) या विषाणुजन्य आजारामुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे निदान राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर (ओडिशा) येथील प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आले आहे.
मृत चितळांच्या मृत्यूच्या निदानासाठी विविध शासकीय संस्थांना समाविष्ट करण्यात आले होते. क्रांतीसिंह नानासाहेब पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ आणि विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन येथील तज्ज्ञांच्या चमूने मृत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने गोळा केले होते. (Latest Pune News)
हे नमुने राष्ट्रीय लाळ खुरकत संशोधन केंद्र, भुवनेश्वर (ओरिसा), भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था, बरेली, विभागीय वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, नागपूर आणि राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग शाळा, भोपाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी भुवनेश्वर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालानुसार प्राण्यांची लक्षणे आणि प्रयोगशाळा तपासणी अहवाल जुळल्याने ‘लाळ खुरकत’ या विषाणूजन्य आजाराचे संक्रमण झाल्याचे निदान झाले.
गुरुवारी दिनांक 24 जुलै 2025 रोजी हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, शुक्रवारी, 25 जुलै 2025 रोजी प्राणिसंग्रहालयासाठी स्थापन करण्यात आलेल्या वन्यप्राणी आरोग्य सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत क्रांतीसिंह नानासाहेब पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वासकर, शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विश्वासराव साळुंखे, विकृती शास्त्र विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर मोटे, परजीवी शास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार, औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ. आंबोरे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. दुषंत मुगळीकर आणि निमंत्रित सदस्य सह आयुक्त पशुसंवर्धन डॉ. जी. एम. हुलसुरे उपस्थित होते.
असा होता तज्ज्ञांचा निष्कर्ष...
तज्ज्ञांच्या निष्कर्षानुसार, चितळ प्राण्यांच्या मृत्यूचे प्राथमिक कारण लाळ खुरकत विषाणू संसर्ग हेच होते. अशा विषाणू संसर्गादरम्यान प्राण्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि पावसाळी प्रतिकूल वातावरणामुळे त्यांची ताण पातळी वाढते, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असते.
पुणे मनपाने संबंधित क्षेत्रात कार्यरत असणार्या शासकीय संस्थांना तत्काळ समाविष्ट करीत प्राण्यांचे शवविच्छेदन करून जैविक नमुने संकलन आणि देशभरातील विविध प्रयोगशाळांकडून करण्यात आलेली तपासणी या सर्व प्रयत्नांमुळे प्राण्यांची मरतुक अल्प कालावधीत नियंत्रणात आणण्यास यश आले. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून, बाधित प्राण्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
- ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा