नारायणगाव: कुकडी प्रकल्पांतर्गत येत असलेल्या धरणांमध्ये पाण्याचा साठा झपाट्याने वाढत असून, मंगळवार (दि. 8) अखेर 46.38 पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी कुकडी प्रकल्पामध्ये अवघे 7.81 टक्के पाणी शिल्लक होते.
जुन्नर तालुक्यातील येडगाव धरणामध्ये 90 टक्के पाणीसाठा झाला असून, माणिकडोह धरण 23.10 टक्के भरले आहे. वडज धरणात 69.79 टक्के पाणीसाठा आहे. या धरणाच्या पश्चिमेला पाऊस अधिक पडत असल्याने मीना नदीपात्रात दोन दिवसांपासून पाणी सोडले जात आहे. पिंपळगाव जोगा धरण 19.04 टक्के भरले आहे. (Latest Pune News)
डिंभे धरणात देखील पाणीसाठा वाढला असून, तो 64.71 टक्के आहे. चिल्हेवाडी धरण देखील 78.78 टक्के भरले आहे. येडगाव धरणामध्ये पाणीसाठा वाढल्याने कुकडी नदीपात्रात 1 हजार 500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून, धरणाच्या डाव्या कालव्यातून 1 हजार 200 क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे.
हे पाणी पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा इथपर्यंत जाणार आहे. सध्या धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडत असल्यामुळे गरज पडल्यास कुकडी नदीपात्रात व कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग अधिकचा वाढविण्यात येणार आहे.
वडज धरणातून मीना नदीपात्रात 1 हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. मीना नदीपात्रात व कुकडी नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने या पाण्याच्या प्रवाहामध्ये कोणीही उतरू नये तसेच नदीच्या कडेला असलेले कृषी पंप काढून घ्यावेत आणि आपली पाळीव जनावरे नदीच्या प्रवाहाकडे नेऊ नयेत.
- रवींद्र हांडे, उपविभागीय अभियंता, कुकडी प्रकल्प, नारायणगाव कार्यालय