सासवड: माळीणच्या घटनेला 30 जुलैला 11 वर्षे पूर्ण होत आहेत. अशाच प्रकारे पुरंदर तालुक्यातील डोंगर उतारावर वसलेल्या 7 गावांतील वाड्या-वस्त्यांना धोका होऊ शकतो. यामुळे धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसविण्याची मागणी होत आहे.
किल्ले पुरंदरच्या पायथ्याशी वसलेली चिव्हेवाडी, बहिरवाडी, घेरा- पुरंदर, पानवडी, मिसाळवाडी, कोंडकेवाडी आदी गावे आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. या ठिकाणी महादेव कोळींची वस्ती आहे. (Latest Pune News)
शासनाच्या वतीने धोकादायक गावे व वाड्या- वस्तीतील लोकांचे संभाव्य धोक्यापासून संरक्षण करणे आवश्यक आहे, असे कोंडकेवाडीचे सामाजिक कार्यकर्ते रोहिदास कोंडके व आदिवासी नेते गणेश मिसाळ यांनी सांगितले.
पुरंदरमध्ये मे महिन्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला, या अनुषंगाने तालुक्यामधील दरडप्रवण क्षेत्राची पहाणी करावी. अशा ठिकाणी रहाणार्या लोकांची जीवितहानी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे आदेश पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी संबंधितांना दिले आहेत.