

पुणे: गुंड नीलेश घायवळ याच्यासह दहा जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. मागील आठवड्यात पोलिस ठाण्यापासून शंभर मीटर अंतरावर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. त्या गुन्ह्यामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
कोथरूडमधील घटनांप्रकरणी सुरुवातीला दाखल गुन्ह्यात सहा जणांना आरोपी करण्यात आले होते. ‘संबंधित आरोपींना नीलेश घायवळ याच्याकडून पिस्तूल देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. (Latest Pune News)
आपली दहशत कमी होत चालली आहे. आपल्याला पैसा मिळत नाही. जरा धाक निर्माण करा’, अशी चिथावणी नीलेश घायवळ याने दिली होती. या कारणाने त्याला आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
टोळीप्रमुख मयुर गुलाब कुंबरे, नीलेश बन्नसीलाल घायवळ, मयंक विजय व्यास, गणेश सतीश राऊत, दिनेश रामभाऊ फाटक, आनंद अनिल चांदेलकर, रोहित विठ्ठल आखाडे, अक्षय दिलीप गोगावले, जयेश कृष्णा वाघ, मुसाब इलाही शेख, अशी मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील कुंबरे, राऊत, चांदेलकर, फाटक, व्यास यांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
घायवळ सध्या विदेशात असून, तो अद्याप भारतात परतलेला नाही. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी देशातील महत्त्वाच्या विमानतळावर लुकआऊट नोटीस बजावली आहे. घायवळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी खून, खंडणी, मारामारी, दरोडा, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुणे शहर आणि पुणे ग्रामीण येथे दाखल आहेत. काही गुन्ह्यांत त्याची निर्दोष मुक्तता देखील झाली आहे. त्याच्यावर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई झालेली आहे. दरम्यान,कोथरूड येथील या गोळीबार प्रकरणामुळे पुन्हा एकदा घायवळ चर्चेत आला आहे.
रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्यांना दुचाकीला जाण्यास साईड दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीनंतर तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. सराईतांनी केलेल्या गोळीबारात प्रकाश मधुकर धुमाळ (36, रा. लोकमान्य कॉलनी, गणेशनगर, थेरगाव) हा तरुण जखमी झाला होता.
कोथरूड पोलिस ठाण्यापासून 100 मीटर अंतरावर असलेल्या मुठेश्वर मित्रमंडळासमोर बुधवारी (दि. 17) रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी हा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपींनी त्यानंतर पुढच्या 10 मिनिटात आणखी एका व्यक्तीवर जुन्या वादाच्या कारणावरून मानेवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.
या दोन्ही घटनांप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्यामार्फत मोक्का अहवाल अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का कारवाईस मंजुरी देण्यात आली आहे.