पुणे: दसरा, दिवाळी, छठपूजा या सणासुदीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी होते. हे लक्षात घेत रेल्वेच्या पुणे विभागातील गर्दी नियंत्रण यंत्रणा आता ’ॲक्टिव्ह मोड’वर गेल्याचे चित्र गुरूवारी (दि. 25) पाहायला मिळाले. स्थानकालगत पार्सल विभागाशेजारी गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र मंडप (होल्डिंग एरिया) उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे, या कक्षात उत्तरेकडे जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या प्रवाशांना थांबविण्याचे नियोजन केले जाणार आहे.
मागील काही वर्षांपूर्वी पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या गर्दीत गुदमरल्यामुळे एका व्यक्तीचे प्राण गेले होते, तशीच घटना मुंबईतही घडली. अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी केली जात आहे. (Latest Pune News)
अशीच तयारी सध्या रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे रेल्वे स्थानकावर सुरू आहे. या तयारीमुळे दसरा, दिवाळी, छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी रोखण्यात यश मिळणार आहे. तसेच, गर्दीमुळे होणारी चेंगरा-चेंगरीसारखी दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
गर्दी नियंत्रणाचे अतिरिक्त नियोजन...
अतिरिक्त तिकीट बुकिंग काउंटरची व्यवस्था
अतिरिक्त मनुष्यबळ तैनात.
कमर्शिअल स्टाफ, आरपीएफ निरीक्षक/जवान, टिसी.
20 एटीव्हीएम/9 तिकीट काऊंटर
नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या.
प्लॅटफॉर्म तिकीट बंधनकारक करणार.
विशेष स्वतंत्र मंडपात काय सुविधा असणार?
मोबाईल चार्जिंग.
मोबाईल टॉयलेट (स्वच्छतागृह), पंखा
बसण्यासाठी व्यवस्था.
पिण्याचे पाणी, उन, वारा, पाऊस
बचावासाठी संरक्षण आच्छादन.
ट्रेनची अपडेट माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक.
रेल्वे सुरक्षा जवानांची सुरक्षा.
आगामी दसरा, दिवाळी, छठपूजा सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. त्यात खास करून उत्तर भागात जाणाऱ्या अनारक्षित प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता आम्ही पुणे रेल्वे स्थानकावर पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र मंडप (होल्डींग एरिया) तयार करत आहोत. या कक्षात प्रवाशांना सर्व पायाभूत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. गर्दीच्या काळात या कक्षात थांबवून प्लॅटफॉर्मवर गाडी आल्यावर प्रवाशांना रांगेत नेऊन गाडीत बसविले जाणार आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी रोखण्यात यश मिळणार आहे.
- हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग