

पुणे: शहरात घरफोड्यांचे सत्र कायम असून, चोरट्यांनी कोथरूड आणि पाषाण परिसरात सदनिकेचे कुलूप तोडून साडेसोळा लाखांचा ऐवज चोरी केल्याची घटना घडली. (Latest Pune News)
कोथरूड भागातील आझादनगर भागात असलेल्या एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १० लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केले. याबाबत एका महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आझादनगर भागातील पद्मनाभ सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (१ नोव्हेंबर) मध्यरात्री चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविले. रविवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
पाषाणमधील सुतारवाडी भागात एका सोसायटीत असलेल्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सहा लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरी केला. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण आणि कुटुंबीय सुतारवाडी परिसरातील एका सदनिकेत राहायला आहेत.
२७ ऑक्टोबर रोजी तरुण आणि त्याचे कुटुंबीय बाहेरगावी गेले होते. चोरट्यानी सदनिकेचे कुलूप तोडले. बेडरुमधील कपाट उचकटून एक लाख ८० हजार रुपयांची रोकड आणि दागिने असा एकूण सहा लाख ३७ हजार ४०० रुपयांचा ऐवज लांबविला. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.